जागेअभावी ग्रामीण रुग्णालय कागदावरच
By Admin | Updated: August 28, 2014 23:40 IST2014-08-28T23:25:28+5:302014-08-28T23:40:45+5:30
जयसिंगपूर : साडेचार कोटी रुपयांचा निधी पडून

जागेअभावी ग्रामीण रुग्णालय कागदावरच
संदीप बावचे - जयसिंगपूर -जागेअभावी येथे होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सध्या अधांतरीच आहे. तब्बल साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनदरबारी पडला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर होणार असून त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजास प्रारंभ होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जागेबाबतच्या कामकाजाचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयात रेंगाळला आहे.
मार्च २०१४ मध्ये जयसिंगपूर येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी स्थलांतरित करून प्राथमिक केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. प्रारंभी निधी मंजूर झाल्यानंतर नगरपालिकेकडे जागेसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या इमारतीजवळील जागेत हे रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
सहा महिन्यांपूर्वी ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर आहे. मात्र, जागेअभावी हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. उदगाव येथील शशिकला क्षय रुग्णालयामधील जागेवर ग्रामीण रुग्णालय बांधण्याबाबतही चर्चा झाली. हा भाग ग्रामीण विभागात येत असल्याने हा प्रस्तावही नाकारण्यात आला. सध्या जयसिंगपुरात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र उदगावला स्थलांतरित करून या ठिकाणी असणारी जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात भिजत पडला आहे. जागा हस्तांतरानंतर गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित केले जाणार आहे.
एकूणच ग्रामीण रुग्णालयाच्या अस्तित्वानंतर जयसिंगपूरसह परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधेचा फायदा होणार आहे आणि तालुक्यातील शिरोळ, दत्तवाडनंतर जयसिंगपूर येथे तिसरे ग्रामीण रुग्णालय नावारूपास येणार आहे. दरम्यान, जागेबाबतचा प्रश्न सुटल्यानंतरच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.
‘शासकीय काम, सहा महिने थांब’
ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी पन्नास लाख रूपयांचा निधी पडून आहे. मात्र, जागेचा प्रश्न सुटला नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याअगोदरच ‘सलाईन’वर अशी अवस्था बनली आहे. आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून शासनाने चांगले पाऊल टाकून निधी मंजूर केला आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे रुग्णांची जणू चेष्टाच होत असल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.