हप्ते पाडून देतो, कारखाना चालवा
By Admin | Updated: November 22, 2015 00:36 IST2015-11-22T00:24:41+5:302015-11-22T00:36:12+5:30
गडहिंग्लज कारखाना : शहापूरकरांना मुश्रीफांचे आव्हान

हप्ते पाडून देतो, कारखाना चालवा
गडहिंग्लज : दोन वर्षे तोटा होऊनदेखील ‘ब्रीसक्’ कंपनीने कारखाना व्यवस्थित चालविला आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत कारखाना चालवायला देण्यात आला, याबाबत आत्मचिंतन करण्याऐवजी माझ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या शहापूरकरांनी गडहिंग्लज कारखाना चालवायला घ्यावा, असे आव्हान आमदार हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकरांना दिले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या संपर्क मोहिमेत सभासदांना कारखाना वाचविण्याचे आवाहन करतानाच शहापूरकरांनी आमदार मुश्रीफांवर टीकेची झोड उठविली आहे. त्यास मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
मुश्रीफ म्हणाले, उसाची बिले वेळेवर न दिल्यामुळे संचालक मंडळावर फौजदारी झाली. तोडणी-ओढणीच्या बिलासह कामगारांचा पगारदेखील थकला होता. अशा स्थितीत केवळ माझ्या शब्दाखातर कंपनीने कारखाना चालवायला घेतला. वार्षिक सभेचा निर्णय आणि शासनाच्या नियमाप्रमाणेच कारखाना चालवायला देण्यात आला आहे.
एकाही अध्यक्षाने कारखान्याच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच कारखान्याचे विस्तारीकरण आणि विकास झाला नाही. जुनी झालेली मशिनरी आणि कामगारांच्या पगारापोटीच वर्षाला १५ कोटींचा खर्च अशा स्थितीत कारखाना फायद्यात येऊ शकत नाही. तरीदेखील कंपनीने एफआरपीप्रमाणे उसाची बिले दिली आहेत.
आता कारखाना कर्जमुक्त झाला आहे. स्टेट बँक आणि युनियन बँकेच्या थकीत देण्याबाबत शहानिशा करण्यासाठी शासनाने कमिटी नेमली आहे. १० वर्षांच्या करारातील दोन वर्षे संपली आहेत. बँकेच्या थकबाकीबाबत निर्णय झाल्यास आणखी चार वर्षे अशी १२ वर्षे मिळतील. ब्रीसक् कंपनीने गुंतविलेल्या रकमेचे हप्ते पाडून
देतो. कंपनीला व संचालकांनाही विनंती करून कारखाना चालवायला देण्यास सांगतो, शहापूरकरांनी
आहे त्या स्थितीत कारखाना चालवायला घ्यावा, असे आव्हानही मुश्रीफांनी यावेळी दिले. यावेळी सतीश पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
..तर आनंद झाला असता
डेक्कन अॅग्रोला शरद पवारांकडून मदत मिळवून देतो असे सांगून फसविल्याचा खोटा आरोप बाबासाहेब कुपेकरांवर त्यांच्या पश्चात करणाऱ्या शहापूरकरांनी स्वत:च्या कर्तृत्वामुळे बंद पाडलेला ‘डेक्कन’ पुन्हा चालू करतो, कामगारांचा थकीत पगार देतो, त्यांच्याकडून नोकरीसाठी घेतलेले पैसे परत देतो, असे जाहीर केले असते तर मला आनंद झाला असता, असा टोलाही मुश्रीफ यांनी शहापूरकरांना लगावला.
बाभूळकर यांचे कौतुक
‘एव्हीएच’ विरोधात सनदशीर व कायदेशीर संघर्ष करून
डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी तो प्रकल्प माघारी परतवून पाठविण्यात यश मिळविले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आज हयात असते तर त्यांनी त्यांची बग्गीतून मिरवणूक काढली असती, अशा शब्दांत आमदार मुश्रीफ यांनी बाभूळकर यांचे कौतुक केले.