पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव
By Admin | Updated: July 15, 2017 00:48 IST2017-07-15T00:48:03+5:302017-07-15T00:48:03+5:30
पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव
ज्योती पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगाव : पाचगावमध्ये पावसाळ्याच्या दिवसात देखील पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. जोरदार पावसाच्या अभावी परिसरातील कूपनलिकेच्या पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी खासगी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी लोकांनी खासगी कूपनलिका, विहिरी व टँकरचा आधार घेतलाच; परंतु आता देखील याच गोष्टींचा आधार पाचगावकरांना घ्यावा लागत आहे. पाचगाव हे कोल्हापूर शहरालगत जरी असले तरीसुद्धा पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. जनावरांना मुबलक पाणी मिळत नसल्याने खासगी कूपनलिका, विहिरींमधून शेतकऱ्यांना दिवसाकाठी हजारो लीटर पाणी उपसा करून सायकल, गाडी व कावड करून आणावे लागत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी चार-पाच दिवसांतून एकदा लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यावर लोकांची तहान भागत नाही. त्यामुळे लोकांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो. २००० लिटरच्या टँकरला ३०० रुपये मोजावे लागतात. पाचगावची वाढती लोकसंख्या व कॉलन्यांचे विस्तारीकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रशासनाकडून अद्यापही कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटेल, अशी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पाचगावमधील शेतकरी शिवाजी पौंडकर, संभाजी गाडगीळ, युवराज जाधव यांनी स्वत:च्या विहिरीतून व कूपनलिकेतून लोकांना पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. गावच्या पााण्याच्या टाकीत विहिरीतील पाणी सोडून गावाची तहान भागविली आहे; परंतु तुटपुंज्या पाण्यावर सर्वांचीच तहान भागत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नासाठी नेमके लोकांनी विचारायचे कोणाला? हा प्रश्न पाचगावकरांना सतावत आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने नेतेमंडळी पाणीप्रश्न सोडवणुकीचे आश्वासन देतात, टँकरने पाणीपुरवठा करतात. मात्र, निवडणूक झाली की, इथला पाणीप्रश्न सोडविणारे नेते या गावाकडे दुर्लक्ष करतात. पाचगावची तहान मात्र कायम राहते. त्यामुळे पाचगावचा पाणीप्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न कायमचाच पाचगावकरांच्या पाचवीलाच पुजला आहे.