अतिक्रमण काढण्यासाठी मंत्रालयापर्यंत धाव
By Admin | Updated: February 19, 2015 23:39 IST2015-02-19T23:30:18+5:302015-02-19T23:39:24+5:30
सवते येथील ग्रामस्थ : ग्रामपंचायत दाद देत नसल्याची तक्रार--लोकमत हेल्पलाईन

अतिक्रमण काढण्यासाठी मंत्रालयापर्यंत धाव
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सवते येथील अवघ्या ५० चौरस फुटांच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक तब्बल सहा वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून जमा केलेल्या कागदपत्रांचा ढीगच दहा किलोंचा झाला आहे; परंतु तरीही शासकीय यंत्रणा ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे चुकीचे कारण पुढे करून आपल्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा मधुकर तुकाराम शिंदे यांचा आरोप आहे.
शिंदे यांची गावात वडिलोपार्जित शेतजमीन व घर आहे; परंतु १९७३ पासून ते नोकरीनिमित्त रायगड जिल्ह्यात राहत आहेत. त्या काळात त्यांच्या घरासमोरील येण्या-जाण्याच्या रस्त्यातच (मिळकत क्रमांक १८४) चार बाय बारा चौरस फुटांच्या जागेत अतिक्रमण झाले. त्यामुळे त्यांना येण्या-जाण्यास अडचण होऊ लागल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे ते काढण्यासाठी अर्ज केला; परंतु त्यांच्या अर्जामुळे गावातीलच योगीराज बालदास महाराज दूध संस्था, परमपूज्य बालदास महाराज संस्था, महादेवराव महाडिक ग्रामीण बिगर शेती संस्था व ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थांचे अतिक्रमण काढण्याचा आदेश झाला. तोपर्यंत या संस्थांनी ग्रामपंचायतीविरुद्ध शाहूवाडी कनिष्ठ स्तर न्यायालयात दावा दाखल केला व न्यायालयाने या कारवाईस १७ आॅक्टोबर २०१२ ला स्थगिती दिली व जिल्हा न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. ज्या सरपंचांच्या कालावधीत या संस्थांना जमिनी देण्यात आल्याच्या चुकीच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या अभिलेखात केल्या आहेत, त्यांचा कार्यकाल कधीच संपला. तत्कालीन सरपंच गणपती रामजी पाटील, मारुती रामचंद्र कांबळे, कुंडलिक रावजी पाटील या तिघांविरोधात पंचायत समितीने शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. चुकीच्या नोंदी केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवक व्ही. व्ही. मुळे, ए. एम. मुल्ला यांना २०१२ मध्ये ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. ग्रामसेवक एम. व्ही. जाधव यांना निलंबित केले आहे; परंतु शिंदे यांची मूळ मागणी बाजूलाच राहिली आहे. त्यांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून ग्रामपंचायत अतिक्रमण काढायला तयार नाही. त्यासाठी बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण दिले जात असून, ते चुकीचे असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.