स्वाईन फ्लू रोगापेक्षा अफवाच भयंकर !
By Admin | Updated: April 10, 2015 00:30 IST2015-04-10T00:20:57+5:302015-04-10T00:30:46+5:30
योग्य उपचाराने रुग्ण होतो बरा : सीपीआरमधील कक्षात महागोंडचा शेतकरी झाला ठणठणीत

स्वाईन फ्लू रोगापेक्षा अफवाच भयंकर !
गणेश शिंदे -कोल्हापूर -एखाद्याला स्वाईन फ्लू झाल्यास समाजाचा त्या रुग्णाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलत आहे. ‘असाध्य रोग’ समजून लोक त्याची हेटाळणी करत आहेत. या आजाराबाबत ग्रामीण भागात तर अफवांचे पीक भयंकर आहे. या प्रकाराबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांकडून वाईट अनुभव येत आहे. असाच अनुभव महागोंड (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबीयांना आला आहे.
येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (‘सीपीआर’) स्वाईन फ्लू कक्षामधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून वसंत कृष्णा बरगे (वय ४८, रा. महागोंड ) यांना स्वाईन फ्लूच्या आजारातून बाहेर काढले. बरगे यांची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वसंत बरगे यांना स्वाईन फ्लूची लक्षणे जाणवू लागल्यावर ४ एप्रिलला ‘सीपीआर’च्या स्वाईन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले. बरगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये त्यांची छाती भरलेली दिसून आली. त्यांच्या घशातील द्रवाच्या (स्वॅप ) नमुन्याचा एक्स-रे काढला. स्वाईन फ्लू हा जंतुसंसर्गजन्य रोग असल्याने त्याचा फैलाव रक्ताच्या माध्यमातून फुप्फुसामधून होऊ नये यासाठी जीवरक्षक प्रणालीवर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने गुरुवारी ते पूर्वीप्रमाणे सर्वांशी बोलू लागले. बरगे यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी स्वाईन फ्लू कक्षाचे डॉ. विलास मनाडे, डॉ. गिरीश पाटील, डॉ. रहिम पटवेगार, डॉ. सचिन शिर्के यांच्यासह कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केले. बरगे यांना गावातील बाळासाहेब भोसले व पत्रकार पवन होन्याळकर यांची मदत झाली.
वेळेत उपचार केल्याने वसंत बरगे यांचा स्वाईन फ्लू बरा होऊ शकला. डॉक्टरांनी काळजी घेतल्याने या प्रयत्नांना यश आले.
- डॉ. बी. डी. आरसूळकर,
जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर,
माझे वडील स्वाईन फ्लूमधून आता ठणठणीत बरे झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आहे. त्यामुळे कोणी नको त्या अफवा पसरवू नयेत.
- राम वसंत बरगे, महागोंड
तिघांचा मृत्यू
‘सीपीआर’च्या रुग्णालयात व महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात खास स्वाईन फ्लू कक्ष उभारण्यात आले. सध्या ‘सीपीआर’च्या कक्षात दोन रुग्ण आहेत. १ फेबु्रवारी ते ९ एप्रिल २०१५ अखेर ‘सीपीआर’च्या कक्षामध्ये स्वाईन फ्लू-संशयित १७ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी हातखंबा (जि. रत्नागिरी) येथील तीन वर्षांच्या मुलाचा, चिंचवाड-हाळ (ता. शिरोळ) येथील एक पुरुषाचा, तर सावर्डे (ता. हातकणंगले) येथील महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद स्वाईन फ्लू कक्षाच्या दप्तरी आहे. दरम्यान, महागोंड व पारगाव (ता. हातकणंगले) येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण सध्या या कक्षात उपचार घेत आहेत.