सत्ताधाऱ्यांना सुरुवातीपासूनच ‘गोकूळ’ची निवडणूक नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:54+5:302021-04-18T04:23:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ‘गोकूळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. आता कोरोनाचा संसर्ग ...

सत्ताधाऱ्यांना सुरुवातीपासूनच ‘गोकूळ’ची निवडणूक नको
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ‘गोकूळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. आता कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, याबाबत उद्या, सोमवारी सर्वेाच्च न्यायालयात निवडणुकीबाबत सुनावणी आहे, आता न्यायालयच निर्णय घेईल. मात्र एक नक्की आहे, सत्तारूढ गटाला ‘गोकूळ’ची निवडणूकच नको असल्याचा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी हाणला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात रोज तीनशे-चारशे रुग्ण कोरोनाबाधित सापडत आहेत. अशा वातावरणात ‘गोकूळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात, ‘गोकूळ’चे वीस ठरावधारक कोरोनाबाधित असून शनिवारी शाहूवाडी तालुक्यातील एका ठरावधारकाचा मृत्यू झाला. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही निवडणूक सुरू आहे. सत्तारूढ गटाला निवडणूक नको आहे, यासाठी ते सहा वेळा उच्च न्यायालयात गेले. आता ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे, मात्र निवडणुकीबाबत आता सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
सत्तारूढ गटाचे चार-पाच जण संपर्कात
माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आमदार पी.एन. पाटील यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, इकडे तिकडे होत असते. सत्तारूढ गटाचे चार-पाच जण आमच्या संपर्कात आहेत. बुधवारी (दि. २१) कोण कोणाकडे आहे, याचे चित्र तुमच्यासमोर येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.