नियमानुसार कारभार करण्याची गरज
By Admin | Updated: June 1, 2015 00:16 IST2015-05-31T23:49:48+5:302015-06-01T00:16:14+5:30
इचलकरंजी नगरपालिका : लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाकडून नागरिकांची अपेक्षा

नियमानुसार कारभार करण्याची गरज
राजाराम पाटील -इचकरंजी -नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेस व शहर विकास आघाडी या दोन्ही पक्षांनी कूपनलिकांवरील पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्यांच्या निविदेतील सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणला. तर आमदार सुरेश हाळवणकर यांनी २१ मे रोजी पालिकेतील प्रशासनाची झाडाझडती घेऊन कारभारावर ताशेरे ओढले. अशा गंभीर घटनांपासून बोध घेत पालिकेतील पदाधिकारी व प्रशासन दोघांनीही आत्मकेंद्रित होऊन नियम व कायद्याच्या चौकटीत कामकाज करण्याची वेळ आली आहे.
साधारणत: दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या राजकारणात दिग्गज ज्येष्ठ नगरसेवक होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासन या तिघांवरही एक वचक असे. योग्य नियोजनाने नियम व कायद्याच्या चाकोरीत नगरपालिकेचे कामकाज चालत असे. पण अलीकडील काळात नवनवीन लोकप्रतिनिधी व काही कारभाऱ्यांच्या तालावर चालणारे प्रशासन पालिकेत आल्याने कारभारात सावळागोंधळ सुरू झाला. अगदी नगरसेवकच मक्तेदार होऊ लागल्याने गैरव्यवहार व आर्थिक वाटाघाटींनी सीमारेषा ओलांडली.
डिसेंबर २०१४च्या अखेरीस पक्षांतर्गत दिलेली मुदत संपूनही नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या बंडाला शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. नंतर उर्वरित कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या जांभळे गटानेही त्यांच्याशी मिळते-जुळते घेतले. मग ‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्वाने सर्वच सत्तेत आले. नवनवीन कारभारी झाले आणि येथूनच कामकाजाचा खेळखंडोबा होण्यास सुरूवात झाली.
मागील आठवड्यात ‘शविआ’चे नगरसेवक प्रमोद पाटील, अध्यक्ष जयवंत लायकर, मदन झोरे यांनी बांधकाम विभागातील कारभाराच्या तक्रारी केल्या. तर नगरसेवक संतोष शेळके यांनी उपोषण केले. त्यानिमित्ताने नगरपालिकेत आलेले आमदार सुरेश हाळवणकर यांनी तडक मुख्याधिकारी सुनील पवार यांच्या कार्यालयात जाऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. नगरपालिका आहे की धर्मशाळा, असे ताशेरे मारत काही नगरसेवक मक्तेदार असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल द्या, असे हाळवणकरांनी सूचित केले.
शनिवारच्या नगरपालिकेच्या सभेत नगरसेवक शशांक बावचकर
व अजित जाधव यांनी कूपनलिकांवर बसविण्यात येणाऱ्या पाणबुडे पंप
व पाण्याच्या टाक्यांमध्ये सव्वाकोटींचा गैरव्यवहार बाहेर काढत प्रशासनाचे वाभाडे काढले.
यावेळी मुख्याधिकारी पवार यांनी आता फक्त नियम
व कायद्यानुसारच पालिकेचे कामकाज चालवू. त्यासाठी नगरसेवक
व व्यवहारांशी सांगड घालणार
नाही, असा इशारा दिला. अशा घटनांनी आता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाने आत्मकेंद्रित होऊन नियम व कायद्यानेच कारभार हाकावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.