'प्रधान डाकघर'मध्ये आरटीओ टपाल वितरण कक्ष
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T00:13:09+5:302015-07-25T01:13:31+5:30
रमेश पाटील : स्पीड पोस्टाने न मिळालेले आरसी बुक, वाहन परवाना नेण्याचे आवाहन

'प्रधान डाकघर'मध्ये आरटीओ टपाल वितरण कक्ष
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या वाहन परवाना, नोंदणी व कर प्रमाणपत्र (आरसी बुक) साठी डाक विभागातर्फे रमणमळा येथील कोल्हापूर प्रधान डाकघर कार्यालयात स्वतंत्र आरटीओ टपाल वितरण कक्ष शुक्रवारपासून सुरू केला आहे. टपाल खात्याच्या स्पीड पोस्टाने प्राप्त न झालेले आरसी बुक व वाहन परवाना आपली ओळख दाखवून या कक्षातून वाहनधारकांना नेता येतील, अशी माहिती कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रधान डाकघर कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या हस्ते आरटीओच्या टपाल कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. रमेश पाटील म्हणाले, आरटीओ कार्यालयाकडून देण्यात येणारे वाहन परवाना, नोंदणी व कर प्रमाणपत्र (आरसी बुक) अशी कागदपत्रे संबंधित वाहनधारकांना स्पीड पोस्टाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम डाक विभागातर्फे सप्टेंबर २०११ पासून सुरू आहे. या वितरण व्यवस्थेनुसार आरटीओकडील वाहन परवाना, नोंदणी व कर प्रमाणपत्र (आरसी बुक) कागदपत्रे संबंधित वाहनधारकांकडे पोहोचण्याचे प्रमाण सुमारे ९८ टक्के आहे. या वितरण व्यवस्थेतून वाहनधारकांना प्राप्त न झालेली कागदपत्रे प्रधान पोस्ट कार्यालयातील आरटीओ टपाल कक्षात पंधरा दिवस राहणार आहेत. आपले ओळखपत्र दाखवून ही कागदपत्रे वाहनधारकांना नेता येतील. पंधरा दिवसांनंतर ही कागदपत्रे आरटीओ कार्यालयातील कक्षामध्ये पाठविण्यात येतील. या वितरण व्यवस्थेमुळे वाहनधारकापर्यंत आर. सी. बुक आणि वाहन परवाना पोहोचण्याचे प्रमाण १०० टक्क्यांवर जाईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. लक्ष्मण दराडे म्हणाले, सप्टेंबर २०११ पासून टपाल कार्यालयाच्या स्पीड पोस्ट सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ३,९२,३०२ वाहन परवाने आणि ४,७२,९१२ आर. सी. बुके वाहनधारकांना पोहोचवण्यात आलेली आहेत; तर ७,६८६, वाहन परवाने आणि ९००९५ आर. सी. बुके आरटीओ कार्यालयाकडे परत आलेली आहेत. ही कागदपत्रे संबंधितांनी आरटीओ कार्यालयातून परत न्यावीत. वाहनासंबंधीची कागदपत्रे स्पीड पोस्टाने पाठविल्यानंतर वाहनधारकाला आरटीओकडून मोबाईलवर मेसेज पाठविण्यात येतो. या पत्रकार परिषदेस कोल्हापूर विभाग प्रधान डाकघर कार्यालयाचे सहायक अधीक्षक संजय देसाई, प्रधान डाकपाल एस. ई. रेळेकर, मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) कागदपत्रे पंधरा दिवस... आरटीओकडून टपाल खात्यातर्फे स्पीड पोस्टाद्वारे पाठविलेली आर. सी. बुक आणि वाहन परवाना ही कागदपत्रे वाहनधारकांना प्राप्त न झाल्यास ही कागदपत्रे स्थानिक पोस्ट कार्यालयात आठवडाभर राहतील. त्यानंतर ही कागदपत्रे कोल्हापुरातील रमणमळा येथील प्रधान डाकघर कार्यालयातील आरटीओ टपाल वितरण कक्षात पंधरा दिवस राहतील. या ठिकाणी ओळखपत्र दाखवून वाहनधारकांना ही कागदपत्रे नेता येतील. सप्टेंबर २०११पासून स्पीड पोस्टाद्वारे ३, ९२, ३०२ वाहन परवाने व ४, ७२, ९१२ आरसी बुक वाहनधारकांना पोहोच वाहन परवाने ७, ६८६ आणि ९००९५ आरसी बुके आरटीओ कार्यालयाकडे परत आली आहेत.