डॉक्टराकडून ३५ लाखांची खंडणी

By Admin | Updated: February 7, 2015 00:06 IST2015-02-06T23:56:48+5:302015-02-07T00:06:37+5:30

सांगलीतील दाम्पत्याचा प्रताप : बदनामी करण्याची धमकी; पतीला अटक

Rs 35 lakh tribute from Doctor | डॉक्टराकडून ३५ लाखांची खंडणी

डॉक्टराकडून ३५ लाखांची खंडणी

सांगली : येथील एका डॉक्टरला बदनामीची धमकी देऊन त्याच्याकडून मार्च २०१२ ते कालअखेर (गुरुवार) सुमारे ३५ लाखांची खंडणी वसूल करून, पुन्हा घर आणि जमीन नावावर करून देण्यासाठी एका दाम्पत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. डॉ. सुहास ज्ञानदेव खांबे (रा. पंचवटी अपार्टमेंट, सिटी हायस्कूल रोड, गावभाग, सांगली) असे या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी गजानन शिवलिंग विभूते (वय ३०) व त्याची पत्नी अर्चना (३०, रा. गावभाग) या दाम्पत्याविरुद्ध शहर पोलिसांत खंडणीची मागणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पतीला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुहास खांबे यांची तपासणी प्रयोगशाळा असून, अर्चना विभूते त्यांच्या घरी मार्च २०११ मध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला होती. ती सातत्याने घरगुती अडचणी सांगून खांबे यांच्याकडे पैशांची मागणी करत असे. तिच्या त्रासाला कंटाळून खांबेंनी तिला डिसेंबर २०१२ मध्ये कामावरून काढले होते. तिने हा प्रकार तिचा पती गजाननला सांगितला. गजाननने खांबेंची भेट घेतली व ‘तुमचे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध असून तुमची बदनामी करू’, अशी धमकी देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. खांबेंनी प्रतिष्ठेला घाबरून त्याला थोडीफार रक्कम देऊन गप्प बसविले. तसेच अर्चनाला पुन्हा स्वयंपाकी म्हणून कामावर घेतले. तेव्हापासून ते कालअखेर (गुरुवार) विभूते दाम्पत्याने खांबेंकडून वारंवार धमकी देऊन सुमारे ३५ लाख रुपये वसूल केले, तरीही त्यांची पैशाची भूक कमी झाली नाही. गेल्या आठवड्यात खांबे यांनी विभूते दाम्पत्यास पैसे देण्यास नकार दिला त्यावेळी या दाम्पत्याने ‘पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला व तुमचा मुलगा निखिलला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर घर व जमीन आमच्या नावावर करा, यासाठी त्यांनी तगादा लावला होता. मालमत्ता नावावर करून देण्यास नकार दिल्यानंतर, दाम्पत्याकडून त्यांना दमदाटी सुरू होती. यामुळे खांबेंनी शुक्रवारी शहर पोलीसात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)


संशयितास कोठडी
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गजानन विभूते यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहुल लागल्याने अर्चना गायब झाली आहे. तिचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Rs 35 lakh tribute from Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.