चिमुकला मानांक बरे होण्यासाठी हवेत अडीच कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:43+5:302021-07-14T04:29:43+5:30
कोल्हापूर-म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील आठ वर्षांचा चिमुकला मानांक खेळायला गेला तर पळता येत नाही, तोल जातो, पाय ...

चिमुकला मानांक बरे होण्यासाठी हवेत अडीच कोटी रुपये
कोल्हापूर-म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील आठ वर्षांचा चिमुकला मानांक खेळायला गेला तर पळता येत नाही, तोल जातो, पाय अडखळतात, जिना चढता येत नाही... डीएमडी या दुर्मीळातील दुर्मीळ आजाराने त्याचे बालपण हिरावून घेतले आहे. वेळीच उपचार झाले नाही तर पुढील दोन-तीन वर्षांत तो अंथरुणाला खिळून राहण्याची भीती आहे. या उपचारांचा खर्च आहे अडीच कोटी, जो पालकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. म्हणूनच त्याच्या आई-वडिलांनी मदतीसाठी कोल्हापूरकरांना साद घातली आहे.
म्हाकवे येथील डॉक्टर दाम्पत्य स्वाती व अभिजित पाटील यांचा मानांक हा मुलगा. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले (सांगोला) यांचा नातू. गेल्या दीड वर्षापासून त्याच्या पायाचे स्नायू आकुंचन पावत आहेत, त्यामुळे तो सहजतेने चालू-पळू शकत नाही. बंगलोरच्या डिस्ट्रॉफी ॲनिहिलेशन रिसर्च ट्रस्टने अनेक चाचण्या करून मानांकला डीएमडी हा अत्यंत दुर्मीळ आजार झाल्याचे निदान केले. या आजारात स्नायूंची शक्ती क्षीण होत जाते, पुढे अंथरुणाला खिळून राहावे लागते. आपल्या बाळावर ही वेळ येऊ नये, त्याचे बालपण फुलावे आणि अन्य मुलांप्रमाणे त्याला सर्वसामान्य आयुष्य जगता यावे यासाठी त्याच्या पालकांची धडपड आहे.
---
११ लाख जमा
या आजारावरील औषध परदेशातून मागवावे लागते. निधीसाठी इम्पॅक्टगुरू या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून दोन महिन्यांत अकरा लाख रुपये जमा झाले आहेत. निधीसाठी जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार, मु्ख्यमंत्री साहाय्यता निधी, पीएम केअर फंड या सगळ्यांकडे प्रस्ताव पाठवले आहेत; पण अजून सकारात्मक प्रतिसाद नाही.
----
देणगी देण्यासाठी तपशील -
गुगल पे / फोन पेसाठी मोबाईल नंबर (स्वाती पाटील) ८२७५३०२९६६
मदतीसाठी बँक खाते क्रमांक : ७००७०१७१७१९०३५४
( येस बँक, शाखा - अंधेरी इस्ट )
खातेदाराचे नाव - मानांकराजे पाटील
IFC code : YESB0CMSNOC
----
आम्ही दोघेही डॉक्टर असलो अडीच कोटी उभे करण्याएवढे आमचे उत्पन्न नाही. काहीही करून बाळाचे बालपण त्याला परत करण्याचा निर्धार आहे, त्यासाठी जिवापाड धडपडत आहोत, वेळीच उपचार झाले नाही तर तो अंथरुणाला खिळून राहण्याची भीती आहे. दानशूर कोल्हापूरकरांना हात जोडून विनंती आहे, आमच्या मुलासाठी मदत करा...
स्वाती पाटील
मानांकची आई
--
फोटो नं १३०७२०२१-कोल-मानांक पाटील
---