शिवदुर्ग संवर्धनासाठी रविवारी गोलमेज परिषद
By Admin | Updated: November 27, 2014 23:53 IST2014-11-27T23:44:07+5:302014-11-27T23:53:25+5:30
गडकोटांच्या संवर्धनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ज्ञ, गडकोटप्रेमी, इतिहासप्रेमी, संशोधक, अभ्यासक

शिवदुर्ग संवर्धनासाठी रविवारी गोलमेज परिषद
कोल्हापूर : गड-दुर्गांच्या साथीने शिवरायांनी आपल्या स्वराज्याची उभारणी केली; पण दुर्दैवाने या गडकोटांची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे. या गडकोटांच्या संवर्धनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ज्ञ, गडकोटप्रेमी, इतिहासप्रेमी, संशोधक, अभ्यासक यांची रविवारी (दि. ३०) भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल येथे सकाळी अकरा वाजता ‘शिवदुर्ग संवर्धन’ गोलमेज परिषद भरविण्यात येणार आहे, अशी माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे निमंत्रक हर्षल सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुर्वे म्हणाले, हे गडकोट म्हणजे महाराष्ट्राचे वैभव होय. हेच वैभव आता ढासळत चालले आहे. या दुर्गांची देखभाल, दुरुस्ती, संरक्षण आणि पुनर्बांधणी जर केली नाही, तर त्यांचे अस्तित्व राहणार नाही. त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी ही परिषद बोलावली आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, या परिषदेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून तज्ज्ञ अभ्यासक, इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी उपस्थित राहून ते आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या विचारांतून गडकोट संवर्धनाचा एक अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर केला जाईल. त्याचसोबत संवर्धनासाठी पुढील दिशाही यावेळी ठरविली जाणार आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होईल. तरी ज्यांना गडकोट संवर्धनासाठी आपले विचार मांडायचे असतील, त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे.
या पत्रकार परिषदेस प्रशांत साळुंखे, राहुल भोसले, प्रमोद पाटील, स्वप्निल यादव, अरविंद मेढे-पवार, अमित आडसुळे, गिरीश जाधव, प्रवीण कारंडे, रूपेश जाधव, चैतन्य अष्टेकर, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)