अक्षयच्या शिक्षणासाठी ‘रोटरी क्लब’चे सहकार्य
By Admin | Updated: September 7, 2014 23:55 IST2014-09-07T23:48:10+5:302014-09-07T23:55:19+5:30
आर्थिक मदतीसाठी आवाहन--यंदाच्या वर्षीची अजून १५ हजार रुपये फी भरणे बाकी आहे.

अक्षयच्या शिक्षणासाठी ‘रोटरी क्लब’चे सहकार्य
बालकल्याण संकुलमधील विद्यार्थी : वीस हजार रुपयांची मदत
कोल्हापूर : निराधारांचा आधार असलेल्या बालकल्याण संकुलामधील अक्षय गोविंद पोतदार या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर स्पेक्ट्रम या संस्थेच्यावतीने वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली.
मूळचा कोल्हापूरचाच असलेला अक्षय अनाथ आहे. बालपणापासून तो बालकल्याण संकुलातच वाढला. विवेकानंद महाविद्यालयात डिप्लोमा केल्यानंतर यंदाच्या वर्षी त्याला डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयात बी. ई. (सिव्हिल) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. या शिक्षणासाठी त्याला दरवर्षी ४० हजार रुपये फी भरावी लागणार आहे.
एवढी मोठी रक्कम भरणे बालकल्याण संकुल या संस्थेलाही अशक्य होते. त्यामुळे संस्थेच्यावतीने रोटरी क्लब आॅफ स्पेक्ट्रमचे अध्यक्ष संदीप मिरजकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही अडचण सांगण्यात आली. मिरजकर यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अक्षयच्या फीसाठी वीस हजार रुपयांची तरतूद केली. बालकल्याण संकुलाने पाच हजार रुपये भरले. अशा रीतीने ४० हजारांपैकी २५ हजार रुपये फी भरण्यात आली आहे. अक्षयच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, कार्यवाह भिकशेठ पाटील, व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
आर्थिक मदतीसाठी आवाहन
अक्षयचा बी. ई. सिव्हिल हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. दरवर्षी त्याला ४० हजार रुपये इतकी फी भरावी लागणार आहे. शिवाय, यंदाच्या वर्षीची अजून १५ हजार रुपये फी भरणे बाकी आहे. त्याचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी शहरातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन बालकल्याण संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे.