मुरगूडमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 12, 2014 00:55 IST2014-08-12T00:52:49+5:302014-08-12T00:55:38+5:30
सहा घरे फोडली : दरोडेखोरांची दगडफेक; दोन घरांतून २५ तोळे सोन्यासह नऊ लाखांचा ऐवज लंपास

मुरगूडमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ
मुरगूड : शहरात दरोडेखोरांनी आज, सोमवारी पहाटे धुमाकूळ घातला. त्यांनी सहा घरे फोडली. चार ठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र, जमादार चौकामधील भरवस्तीतील अनिसखान इकबाल जमादार यांच्या घरातून पंचवीस तोळे सोन्याचे दागिने, पन्नास हजारांची रोकड, मोटारसायकल यांसह अंदाजे नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. अन्य एका घरातील पाच ग्रॅम सोन्याचे, काही चांदीचे दागिने व पाच हजारांची रक्कम दरोडेखोरांनी लांबविली. आरडाओरडा करणाऱ्या एका नागरिकावर त्यांनी दगडफेकही केली. यामुळे शहरवासीयांत घबराट पसरली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, एस. टी. स्टँडच्या मागील बाजूस असणाऱ्या ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये नितिकेश पाटील यांचा बंगला आहे. त्यांच्या वरील मजल्यावर तलाठी पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर राहतात. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने ठाकूर गॅलरीत आले. त्यावेळी त्यांना बंगल्याच्या खाली दोन व्यक्ती कडी-कोयंडे तोडत असल्याचे दिसले. त्यांना पाहून ठाकूर यांनी मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते दोघे व रस्त्यावर उभे असलेल्या चौघांनी ठाकूर यांच्या दिशेने दगड, विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातामध्येही धारदार शस्त्रे होती. दगडफेक होऊ लागल्याने ठाकूर यांनी आत येऊन तत्काळ मुरगूड पोलीस, तहसीलदार, आदींना फोनवरून ही माहिती दिली.
पोलिसांनी ही घटना गस्तीवरील पोलिसांना कळविली. /पान ९ वर
शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ह. भ. प. श्रीकृष्ण देशमुख यांच्या बंगल्यावरही असाच धाडसी दरोडा पडला होता. त्याचा तपास अद्याप लागला नसताना पुन्हा हा दरोडा पडला. त्यामुळे या चोरट्यांना काहीही करून पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी होत आहे.
सहाजणांचा समावेश
नितिकेश पाटील यांच्या बंगल्याचे कुलूप तोडताना झालेल्या आवाजाने जागे झालेले तलाठी ठाकूर यांनी चोरट्यांना पाहिले आहे. ते सहाजण होते. प्रत्येकाच्या हातामध्ये सुरी, सत्तूर अशी हत्यारे होती. याशिवाय त्यांनी स्वेटर, टोपी घातली होती. दोघांनी अंगावर चादर घेतली होती, अशी माहिती त्यांनी सांगितली.