अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
By Admin | Updated: November 24, 2015 00:22 IST2015-11-23T23:46:31+5:302015-11-24T00:22:56+5:30
कल्पकतेने प्रगती साधण्याची गरज : संधी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
घन:शाम कुंभार-- यड्राव --शासनाने कायदा केला की, त्याची अंमलबजावणी किती काटेकोर व प्रामाणिकपणे होते, यावर त्या कायद्याची यशस्वीता अवलंबून असते. या शिक्षण कायद्यात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण न देता कल्पक मार्गाने त्याच्यातील प्रगती साधणे हा कायद्याचा मुख्य हेतू असूनही अप्रगत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखविला. शाहू महाराजांनी वंचितांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी शंभर वर्षांपूर्वीच लेजिसलेटिव्ह असेंब्लीमध्ये भारतीय मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्याची विनंती केली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देऊन तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सामाजिक आणि शैक्षणिक सहभागाविषयीच्या योजना राबविल्या. हे या नेत्यांनी आणि थोर समाजसुधारकांनी आधीच ओळखले होते. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यामुळे मिळाला. परीक्षा नसल्याने मुलांमधील परीक्षेची भीती कमी झाली. त्यामुळे अभ्यास व कष्ट करण्याची प्रवृत्ती मंद झाली. यामुळे वाचन संस्कृती लोप पावू लागली. पाढे पाठांतराचा पत्ताच नाही. शुद्धलेखन म्हणजे काय किंवा लिखाण व हस्ताक्षर याची कलाच माहिती नाही. या ज्ञानाचे विद्यार्थ्यांना महत्त्व वाटत नाही. यासाठी शासन वाचन प्रेरणा दिवस यासारखे उपक्रम राबवत आहे. त्याची अंमलबजावणी करणारे हे शिक्षकच असतात. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय शाळांमधून लावली जात नाही, तोपर्यंत प्रगत, अप्रगत हा विद्यार्थी गट राहणारच आहे. (पूर्वार्ध)+
आवड ओळखण्याची गरज
प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ताप्राप्त असावा, अशी अपेक्षा असते. परंतु, ते व्यवहारात कमालीचे यशस्वी झाले आहेत. अप्रगत विद्यार्थ्याला नाउमेद करता कामा नये. विद्यार्थ्यांचा कोणत्या कला-कौशल्याकडे कल आहे, त्याला कशाची आवड आहे, हे त्याला विश्वासात घेऊन शिक्षकांनी शक्य असल्यास संधी निर्माण करण्यास मदत करावी. वेळीच त्याच्या कमी ज्ञान असलेल्या विषयात थोडी काळजी घेतल्यास त्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. अप्रगत विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.