सरुड : शाहूवाडी तालुक्यातील होत असलेल्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मुंबई-पुणेस्थित मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असून, ग्रा. प. निवडणुका होत असलेल्या सर्वच गावांमध्ये आघाडी प्रमुखांनी या मतदारांसाठी विशेष यंत्रणा राबविली आहे.
शाहूवाडी तालुका हा डोंगराळ व दुर्गम असल्याने तसेच तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या अपेक्षित असा विकास झाला नसल्याने तालुक्यातील दुर्गम भागाबरोबर वाड्या-वस्त्यावरील बहुतांश तरुण तसेच मध्यमवयीनवर्ग नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या कुटुंबांसह मुंबई तसेच पुण्याच्या विविध भागांत वास्तव्यास आहेत. ते नोकरी, व्यवसायाच्या कामासाठी जरी मुंबई-पुण्यात वास्तव्यास असले तरी त्यांचे मतदान आपल्या मूळ गावाकडेच आहे. अशा मुंबई, पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील मतदारांची संख्या जास्त आहे.
ग्रा. प. निवडणूक लढवत असलेल्या सर्वच उमेदवारांनी सुरुवातीपासूनच गावपातळीवरील स्थानिक मतदाराप्रमाणेच मुंबई, पुणेस्थित मतदारांच्यावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात बहुतांश उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मुंबईला जाऊन तेथील आपापल्या गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच मतदारांना मतदानासाठी ने-आण करण्यासाठीही खास सोय केली आहे. त्यामुळे अटी-तटीच्या लढती असणाऱ्या अनेक गावांमध्ये हे मतदार निर्णायक ठरणार आहेत .
मुंबई , पुणेस्थित मतदारांसाठी मोजावी लागणार मोठी ‘किंमत’
मुंबई-पुणेस्थित असणारे शाहूवाडी तालुक्यातील किती मतदार मतदानासाठी स्वखर्चाने गावाकडे येणार हा संशोधनाचा भाग आहे . जर या मतदारांनी मतदानासाठी गावाकडे ने-आण करण्याची अपेक्षा संबंधित उमेदवारांकडे ठेवली तर यामध्ये मुबंई, पुणेस्थित मतदारांचे हे मतदान मिळविण्यासाठी सर्वच उमेदवारांना मोठी ‘किंमत’ मोजावी लागणार हे स्पष्ट आहे.