रोहितची हितेशकुमारला धोबीपछाड

By Admin | Updated: September 15, 2014 00:08 IST2014-09-14T23:29:49+5:302014-09-15T00:08:41+5:30

कुंडल कुस्ती मैदान : कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

Rohit's Hiteshkumar Dhobi Pachad | रोहितची हितेशकुमारला धोबीपछाड

रोहितची हितेशकुमारला धोबीपछाड

धनाजी आवटे - कुंडल -हजारो कुस्तीशौकिनांनी खचाखच भरलेल्या कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात हिंदकेसरी रोहित पटेलने सहाव्या मिनिटाला हिंदकेसरी व भारतकेसरी हितेशकुमार याला धोबीपछाड डावावर चितपट केले व पाच लाख रुपयांचे बक्षीस पटकावून हजारो कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली.
कुंडल (ता. पलूस) येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आज, रविवारी महाराष्ट्र कुस्ती मैदान पार पडले. क्रांती उद्योग समूहाच्यावतीने हिंदकेसरी रोहित पटेल (धुमछेडी आखाडा, पंजाब) व हिंदकेसरी व भारतकेसरी हितेशकुमार (धर्मवीर आखाडा, पंजाब) यांच्यात प्रथम क्रमांकाची पाच लाख रुपये बक्षिसाची कुस्ती लावण्यात आली होती. प्रारंभी रोहित पटेल व हितेशकुमार यांनी एकमेकांची ताकद अजमावली. दोघांची खडाजंगी सुरू असताना अवघ्या सहाव्या मिनिटाला रोहित पटेलने आक्रमक पवित्रा घेत हितेशकुमारवर धोबीपछाड डावावर विजय मिळविला.
द्वितीय क्रमांकाची चार लाख रुपये बक्षिसाची कुस्ती महेंद्र आप्पा लाड मित्रमंडळाच्यावतीने हिंदकेसरी कृष्णकुमार (लाली आखाडा, पंजाब) विरुद्ध हिंदकेसरी परवेश (सोनिपत आखाडा, हरियाणा) यांच्यात लावण्यात आली. प्रारंभी कृष्णकुमारने परवेशवर कब्जा घेतला; पण परवेशने कृष्णकुमारचा कब्जा उधळून लावला. पुन्हा दोघांची खडाजंगी झाली. कृष्णकुमारने पुन्हा कब्जा घेतला व १९व्या मिनिटाला कृष्णकुमार घुटना डावावर विजयी झाला.
तृतीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी सुनील साळुंखे (खवासपूर) विरुद्ध विजय चौधरी (धुमछेडी आखाडा, पंजाब) यांच्यात झाली. स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन रामचंद्र लाड यांच्यातर्फे ही कुस्ती तीन लाख रुपये बक्षिसासाठी लावण्यात आली. प्रारंभी सुनील साळुंखे याने विजय चौधरीवर कब्जा घेतला. हा कब्जा धुडकावून विजय चौधरीने दहाव्या मिनिटाला घुटना डावावर सुनील साळुंखेवर विजय मिळविला व तीन लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.
चौथ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने हरियाणा केसरी रामदिन याच्यावर घिस्सा डावावर विजय पटकाविला व दोन लाख रुपये बक्षीस मिळविले.
पाचव्या क्रमांकाची कुस्ती कौतुक डाफळे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार यांच्यात दोन लाख रुपये बक्षिसासाठी झाली. या कुस्तीत नंदू आबदारने कौतुक डाफळेवर दुहेरी पट काढून अवघ्या ३० सेकंदांत विजय मिळविला.
एक लाख रुपये बक्षिसाच्या कुस्तीत अतुल पाटीलने संग्राम पाटीलवर घुटना डावावर विजय पटकावला. मारुती जाधवने विजय गुटाळवर एकलांगी डावावर विजय मिळविला. संतोष दोरवरने अभिजित भंडारेवर घिस्सा डावावर विजय मिळविला. संग्राम पोळने रमेशवर निकाल डावावर विजय मिळविला. सूरज निकमने काळेलवर घुटना डावावर विजय मिळविला.
या मैदानात महादेव वाघमोडे, विकास राजगे, वैभव बंडगर, विलास पवार, नाथा पालवे, अजय निकम, कपिल सनगर, सागर मोरे, तुषार निकम, अनिकेत मोरे, पृथ्वीराज मदने, विजय सिसाळ, दयानंद घोडके, कुलदीप खांडेकर, अभिजित मोरे, नीलेश पवार, अरुण मंडले, विक्रम चव्हाण, समीर मुल्ला, नारायण एडके, रोहित एडके, ओंकार मदने, अनिकेत गावडे, सौरभ सव्वाशे, विजय डोंगरे, ऋषिकेश जाधव या मल्लांनी तसेच कर्जत हवालदार व पूजा जाधव या महिला मल्लांनी दिमाखदार कुस्त्या केल्या.
प्रारंभी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड, पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित होते. समालोचन शंकर पुजारी, ईश्वरा पाटील व महादेव लाड यांनी केले.
या मैदानास पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, खा. संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विश्वजित कदम, आ. बाळासाहेब पाटील, संदीप राजोबा, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, रणधीरसिंग पोंगल, हणमंत जाधव यांनी भेट दिली.

Web Title: Rohit's Hiteshkumar Dhobi Pachad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.