कावड करून रोहित्रे नेली.. कृषिपंपांना वीज मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:20+5:302021-09-17T04:29:20+5:30
कोल्हापूर : पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या महावितरणच्या जयसिंगपूर सबस्टेशनमधील ८८९ विद्युत रोहित्रे दुरुस्त करून ७ हजार ...

कावड करून रोहित्रे नेली.. कृषिपंपांना वीज मिळाली
कोल्हापूर : पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या महावितरणच्या जयसिंगपूर सबस्टेशनमधील ८८९ विद्युत रोहित्रे दुरुस्त करून ७ हजार ६०० कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची अवघड मोहीम कर्मचाऱ्यांनी पार पडली आहे. गाळामुळे रोहित्र वाहून नेण्यात अडचणी असतानादेखील कावड करून रोहित्रे नदी काठावर नेत वीज पुरवठा सुरळीत केला गेला आहे.
जिल्हयात महापुरामुळे नदीकाठी असणाऱ्या महावितरणच्या विद्युत यंत्रणेला मोठा फटका बसला. वीज खांब, रोहित्रे जमीनदोस्त झाल्याने, तसेच वीज तारा तुटल्याने बहुतांश कृषिपंप वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. कोल्हापूर मंडळांतर्गत असणाऱ्या जयसिंगपूर विभागास महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. येथील ११२७ विद्युत रोहित्र, ४५७ उच्चदाब वीज खांब, १९६९ लघुदाब वीज खांब नादुरुस्त झाले होते. महावितरण कर्मचाऱ्यांनी कसरत करून ८८९ विद्युत रोहित्र, ४०१ उच्चदाब वीज खांब, १५७४ लघुदाब वीज खांब उभारून कृषिपंपांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. चिखल-गाळ, पुराचं पाणी असल्याने वाहने जाणे शक्य नसल्याने कावड करून कर्मचाऱ्यांनी विद्युत वितरण रोहित्रांची वाहतूक केली. वीजग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण सदैव दक्ष आहे. त्याचा प्रत्यय जयसिंगपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आणून दिला. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदील व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही अवघड कामगिरी पार पाडली.
आरोग्य राज्यमंत्र्यांकडून कौतुक
महापुराने बाधित झालेला जयसिंगपूर नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजनेसह शहर व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत केल्याबद्दल आरोग्य व कुटुंबकल्याण, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.