साखरेच्या इंधनावर झेपावले रॉकेट
By Admin | Updated: September 7, 2014 00:24 IST2014-09-07T00:22:38+5:302014-09-07T00:24:31+5:30
प्रक्षेपणाचा थरार : संशोधकांच्या प्रयत्नांना यश, तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार

साखरेच्या इंधनावर झेपावले रॉकेट
कुपवाड : गुजरातमधील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकाकडून साखरेच्या इंधनाचा वापर करून बनविण्यात आलेल्या रॉकेटने आज शनिवारी मिरजेतील क्रीडांगणावर अपेक्षित उद्दिष्ट गाठत आकाशात भरारी घेतली. संशोधकांच्या प्रयत्नांना आलेल्या या यशाला उपस्थितांनी टाळ््यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या मैदानावर मोठ्या उत्साहात प्रक्षेपण करण्यात आले़ स्पेस टेक्नॉलॉजीसह रॉकेट प्रक्षेपणाचा थरार आज या संशोधकाकडून सांगलीकरांना अनुभवायला मिळाला़ समाजहितासाठी या रॉकेट तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असल्याचेही संशोधकांकडून सांगण्यात आले आहे़
दरम्यान, नासाने या रॉकेट प्रक्षेपणाची दखल घेऊन संशोधकांचे अभिनंदन केले असून, भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटमध्ये या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
या रॉकेट प्रक्षेपणाची तीन महिन्यांपासून तयारी करण्यात येत होती़ कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यासाठी परिश्रम घेत होते़ प्रक्षेपण स्थळाच्या जवळच इंधनाचा डेपो असल्याने दीड किलोमीटरपर्यंतच या रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आले़ यावेळी कॉलेज विद्यार्थ्यासह हजारो नागरिकांनी हा थरार अनुभवण्यासाठी गर्दी केली होती.
इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे संशोधक किरण नाईक यावेळी म्हणाले की, आम्ही आता समाजहितासाठी रॉकेट बनविणार आहोत़ या रॉकेट तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करता येणार आहे़ दुष्काळी भागात कमी खर्चामध्ये पाऊस पाडता येईल़ शासनाचा खर्चही वाचेल़ अतिवृष्टीही थांबविता येईल़ रिसर्च सेंटर उभारून पहिले नागरी विमान तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत़ भविष्यात ७ ते १४ किलोमीटर उंचीपर्यंत उडणारे रॉकेट तयार करण्यासाठी शासन व इस्त्रोची मदत घेणार आहोत.
यावेळी संजय भोेकरे म्हणाले की, आम्ही संशोधनाला बळ देण्यासाठी जास्तीत-जास्त प्रयत्न करीत आहोत. त्याचाच हा एक भाग आहे. नासाला या रॉकेट प्रक्षेपणाविषयीचा अहवाल गेल्यावर त्यांच्याकडून अभिनंदन केले गेले़
या रॉकेट प्रक्षेपणप्रसंगी इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक, अब्दुल रहमान वनू, एरोस्पेस विभागप्रमुख राजेश मुनेश्वर, प्रसाद रावराणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय पवार, युवा संशोधक राजेंद्रसिंग रजपूत, डॉ़ चंद्रकांत पाटील, सुमंत कुलकर्णी, कार्यकारी सागर कुलकर्णी, महंमद मणेर, किरण मुळगुंद, डॉ़ एम़ वाय़ खिरे उपस्थित होते़ (वार्ताहर)