‘सार्वजनिक बांधकाम’चे रस्ते ३१ जानेवारीपर्यंत खड्डेमुक्त
By Admin | Updated: January 3, 2016 01:13 IST2016-01-03T01:13:33+5:302016-01-03T01:13:33+5:30
पालकमंत्री : जिल्ह्यात रस्ते विकासाचा ‘युनिक प्रोजेक्ट’

‘सार्वजनिक बांधकाम’चे रस्ते ३१ जानेवारीपर्यंत खड्डेमुक्त
कोल्हापूर : जिल्ह्यात रस्ते विकासाचा ‘युनिक प्रोजेक्ट’ सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर ३१ जानेवारीनंतर एकही खड्डा राहणार नाही, असा शासनाचा संकल्प असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत असून, रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ३१ जानेवारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर खड्डा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. याबरोबरच जिल्हा परिषदेकडील रस्ते दुरुस्तीच्या खर्चाचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तत्काळ तयार करून द्यावा, त्यानुसार शासन स्तरावर अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्य शासन ७ वर्षांचा समयबद्ध कालावधीचा रस्ते विकासाचा सुमारे ४ हजार कोटींचा प्रस्तावित कार्यक्रम तयार करणार असून, २०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडले जाईल, या प्रस्तावानुसार शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या तालुक्यामधील जिल्हा परिषदेचे कोणते रस्ते पी.डब्ल्यू.डी.कडे वर्ग करावयाचे आहेत. याची यादी तत्काळ द्यावी. राष्ट्रीय महामार्गामध्ये जे रस्ते समाविष्ठ व्हावेत असे वाटतात, अशा रस्त्यांची यादी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. (प्र्रतिनिधी)