लॉकडाऊनमुळे करवीरमध्ये रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:00+5:302021-05-17T04:22:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा झाल्याने करवीर तालुक्यातील ग्रामीण भागासह उपनगर व ...

लॉकडाऊनमुळे करवीरमध्ये रस्ते निर्मनुष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा झाल्याने करवीर तालुक्यातील ग्रामीण भागासह उपनगर व शहरालगतच्या गावात याचा परिणाम जाणवत होता. रविवारी अवजड मालवाहतूक करणारे एखादं-दुसरे वाहनच रस्त्यावर दिसत होते.
मध्यरात्रीपासून वादळी वारे व पाऊस सुरू आहे. रविवार असल्याने सर्वच क्षेत्रातील आस्थापनांची कार्यालये, व्यवहार, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, व्यापारी यांचा लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कडक लॉकडाऊनसाठी प्रसंगी काठीचा प्रसाद व तुरुंगाची हवा खायला लागेल, असे जाहीर केल्याने जनतेतूनही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत होते.
आज सकाळपासून वाहतुकीच्या मोठ्या मार्गावर अवजड वाहतूक करणारी वाहने वगळता रस्ते निर्मनुष्य झाले होते. करवीर तालुक्यात शहरात जाणाऱ्या मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात आल्याने लोकांचा ओघ कमी झाला होता. मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंदच दिसत होते. विशेषतः कोठेही मोठा पोलीस फौजफाटा नव्हता.
कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पुरवठा व आज रविवारी सुट्टी असली, तरी उद्यापासून बँकाही बंद राहणार असल्याने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी यशस्वी होईल, अशी आशा आहे. ग्रामीण भागातही सकाळी दूध संस्थांचे दूध संकलन झाल्यानंतर सर्वत्र सामसूम दिसत होती.
फोटो
कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर कोपार्डे येथे नेहमी गजबजलेला सांगरुळ फाटा परिसर निर्मनुष्य होता.