कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर
By Admin | Updated: November 9, 2014 23:31 IST2014-11-09T23:13:07+5:302014-11-09T23:31:12+5:30
हसन मुश्रीफ : आजरा कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर
आजरा : साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत उसाला जादा दर देता येत नाही. साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. सद्य:स्थितीत शासनाकडून भरीव अनुदान थेट ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले जाण्याची गरज आहे. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे. सध्या केंद्रात व राज्यात आपण विरोधी बाकावर असल्याने साखर कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरणार, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
आजरा साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगाम प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आ. संध्यादेवी कुपेकर होत्या. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष मारुतीराव घोरपडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांनी व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास तडा न जाऊ देता किमान वैधानिक दरापेक्षा जादा दर कारखान्याकडून दिला गेला आहे. सध्या बाजारातील साखरेचे दर पाहता ऊस वाहतुकीसह कारखाना कर्मचारी पगार व इतर खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसणे कठीण आहे. डिस्टीलरीचा छोटा प्रकल्प सुरू करून उत्पन्न वाढविण्यास संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखानदारी मोडीत निघाल्यास अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील, यासाठी सरकारकडून साखर कारखान्यांबाबत सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांत साखर कारखानदारीसमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. उत्पादित साखरेसाठी प्रत्येक पोत्यामागे सरकारने ५०० रुपये थेट अनुदान द्यावे. अडचणी आहेत म्हणून संचालक मंडळाने खचून न जाता सहवीज प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्प यांसारखे उपक्रम हाती घ्यावेत.
आ. मुश्रीफ म्हणाले, गेले पंधरा वर्षे आघाडी सरकारची सत्ता होती; आता बसपाळी मिळाली आहे. सत्ता गेल्यामुळे लोकांची कामे करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. येथून पुढे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची तयारी ठेवावी, कारण आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही. के. पी. पाटील हे जिद्दी असल्याने भविष्यात त्यांचे लालदिव्याचे स्वप्न साकार होईल, असेही स्पष्ट केले.
यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, मुकुंदराव देसाई, अशोक चराटी, वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या संजीवनी गुरव, विलास नाईक, विजयकुमार पाटील, उपसभापती दीपक देसाई, तुळशीराम कांबळे, सुधीर देसाई, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, राजू होलम, अनिल फडके, असलम खेडेकर, कारखान्याचे संचालक, कर्मचारी, सचिव व्यंकटेश ज्योती यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक पी. एल. हरेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)