प्रसंगी शाळेसाठी पालकांसोबत रस्त्यावर !
By Admin | Updated: July 4, 2014 00:52 IST2014-07-04T00:42:11+5:302014-07-04T00:52:58+5:30
कोळकींचा खुलासाच खोटा : भद्रापूर यांचा पलटवार

प्रसंगी शाळेसाठी पालकांसोबत रस्त्यावर !
गडहिंग्लज : संकुचित राजकारणातूनच दिनकरराव शिंदेमास्तर शाळा इमारत बांधकामात अडथळे आणले जात आहेत. श्री महालक्ष्मीच्या गरीब भक्तांचीच मुले या शाळेत शिकत असल्यामुळे वारंवार कोर्टाच्या निकालाचा दाखला देत जागेच्या मालकीचा वाद उपस्थित न करता देवस्थान समितीने मोठ्या मनाने ही जागा शाळेसाठी नगरपालिकेला स्व:खुशीने द्यावी, अन्यथा शाळेच्या इमारतीसाठी पालकांना सोबत घेऊन मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नगरपालिका बांधकाम समितीचे सभापती नरेंद्र भद्रापूर यांनी पत्रकार परिषदेत दिला. ३० जूनच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भद्रापूर यांनी येथील श्री लक्ष्मी मंदिर आवारातील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर वैदिक शाळा बांधण्याच्या प्रस्तावास तीव्र विरोध केला होता. त्यासंबंधीच्या खुलाशात देवस्थान समितीचे अध्यक्ष कोळकींनी प्रस्तावाची माहिती न घेताच भद्रापूरनी खोटी माहिती देऊन सभागृह व नागरिकांची दिशाभूल करण्याबरोबरच राजकारणातून विकासकामास विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यास भद्रापूर यांनी पुराव्यासह जोरदार प्रत्युत्तर दिले व कोळकींचा खुलासाच खोटा असल्याची
टिप्पणी केली.
लोकशाही संकेतानुसार पालिकेच्या सभागृहात व्यक्त केलेल्या आपल्या भावनेचा सभागृहाबाहेर झुंडशाहीने निषेध नोंदवून स्वतंत्र सत्तास्थान निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवत असल्याचेही भद्रापूरनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, नगरसेवक राजेश बोरगावे व बसवराज खणगावे, जनुसराज्य तालुकाध्यक्ष सोमगोंडा आरबोळे, शहराध्यक्ष बी. बी. पाटील, बाळासाहेब गुरव, रमेश रिंगणे, जितेंद्र पाटील, उदय परीट, अजित विटेकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)