रंकाळ्याजवळ ‘आयआरबी’चा रस्ता खचला
By Admin | Updated: October 23, 2014 00:01 IST2014-10-22T23:12:35+5:302014-10-23T00:01:55+5:30
नागरिकांतून संताप : दोन फुटांची मोठी भेग पडून रस्ता चॅनेलसह शेतात कोसळला; खराब रस्त्यांचा नमुना उघड

रंकाळ्याजवळ ‘आयआरबी’चा रस्ता खचला
कोल्हापूर/फुलेवाडी : रंकाळा-फुलेवाडी दरम्यान पेट्रोल पंपासमोरील ‘आयआरबी’चा रस्ता आज, बुधवारी पहाटे खचला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला दोन फुटांची मोठी भेग पडून रस्ता व चॅनेलचा सुमारे दीडशे फुटांचा मोठा भाग शेतात कोसळला. खराब रस्त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुपारनंतर ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या भागाची सफाई करण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील फुलेवाडीदरम्यानचा रस्त्याचा मोठा भाग खचल्याचे पहाटे नागरिकांच्या निदर्शनास आले. रस्त्याच्या कडेला पावसाळी पाणी जाण्यासाठी तीन फुटांचे चॅनेल व त्यावर पदपथ बांधण्यात आला आहे. या पदपथासह चॅनेलचा सुमारे दीड फुटाचा मोठा भाग शेजारील शेतात कोसळला. रस्त्याच्या कडेला सुमारे दोन ते दहा फूट खोल व दोन फूट रुंदीची भेग पडली. घडल्या प्रकाराबाबत ‘आयआरबी’च्या जिल्हा व राज्य व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, महापालिका व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी खचलेल्या भागातील खरमाती काढण्यास दुपारी सुरुवात केली. टोलविरोधात लढा सुरू असतानाच ही घटना घडल्याने याचे पडसाद टोलनाक्यांवरही उमटत होते.
नेमके कारण
या परिसरात काळ्या मातीची शेती आहे. शेजारी रंक ाळा असल्याने या परिसरातील जमीनही ओलसर असते. ओली काळी माती व पाया नसल्याने येथे घरे बांधताना खोलवर पाया काढावा लागतो. मात्र, रस्तेबांधणी करताना ठेकेदाराने आवश्यक काळजी घेतलेली नाही. ‘वडाप’ काम केल्यानेच हा रस्ता खचल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांतून संताप
याच रस्त्यासाठी आयआरबी ३० वर्षे टोल आकारणी करणार आहे. त्यानंतर रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. टोलवसुलीच्या पहिल्या वर्षातच रस्त्यांची ही अवस्था आहे. ३० वर्षांनंतर रस्ते कसे असणार? यानंतर पुन्हा सत्ताधारी हे रस्ते दुरुस्तीसाठी टोल लावणार काय? असा सवाल उपस्थित करीत अस्सल कोल्हापुरी भाषेत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नाक्यांवर पडसाद
‘टोल प्रश्न न्यायालयात आहे, टोल देणार नाही,’ असे यापूर्वी वाहनधारक सांगत होते. आज रस्ता खचल्याने वाहनधारक टोल मागणाऱ्यांना ‘टोल पाहिजे; मग खराब रस्ते कोण पूर्ण करणार?’ असा सवाल करीत होते. त्यामुळे फुलेवाडी नाक्यावरील टोलवसुली दिवसभर बंद होती.
कृती समितीतर्फे ‘रास्ता रोको’
खचलेल्या रस्त्याप्रकरणी आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे पोलिसांना करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे कृती समितीचे कार्यकर्ते उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी ‘रास्ता रोको’ करणार आहेत. समितीने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
चॅनेल निकृष्ट दर्जाचे
रस्ते प्रकल्प राबविताना अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रस्त्याची उंची नको तितकी वाढविल्याने संपूर्ण शहराचा जमीनस्तर दीड फुटाने वाढला आहे. रस्त्याशेजारी पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेले चॅनेल निकृष्ट दर्जाचे आहे. अनेक ठिकाणी हे चॅनेल अर्ध्यातच बंद आहेत. काही ठिकाणी काटकोनात वळविले आहेत. वाढलेली उंची व खराब चॅनेलचा आज पहिला दणका बसून रस्ता खचल्याचे बांधकामतज्ज्ञांचे मत आहे.