करवीर पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था

By Admin | Updated: January 23, 2015 00:47 IST2015-01-22T22:58:51+5:302015-01-23T00:47:46+5:30

पंतप्रधान सडक योजना थंडावली : निधीअभावी डांबरीकरण, रुंदीकरण नाही

Road condition in Karveer west | करवीर पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था

करवीर पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था

सावरवाडी : केंद्र शासनाच्या शासकीय निधीचा अभाव, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे खासदारांचे झालेले दुर्लक्ष, पंतप्रधान सडक योजनांचे थंडावलेले काम, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, डांबरीकरण व खडीकरणांची ठप्प झालेली कामे, या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था निर्माण झाली.रस्त्यांमध्ये प्रचंड स्वरूपाचे खड्डे पडल्याने ग्रामीण वाहतूक ठप्प होऊ लागली आहे. रस्ते दुरुस्तीची कामेही थंडावली आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’, अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची ऊस वाहतूक जोरदार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मोरीची बांधकामेही रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. नागमोडी वळणे आहेत, तेथे सूचना फलक नाहीत. साईडपट्ट्यांचे कामही थांबले आहे.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात उत्तर व दक्षिण दिशेला वाहतुकीसाठी मोठ्या रस्त्यांचे प्रकल्पही शासनदरबारी धूळ खात पडले आहेत. शासकीय निधीअभावी मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण झालेले नाही. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने ग्रामीण वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यातच रस्त्यावर उसाचा पाला टाकण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडत असून, त्यामुळे अपघातची दाट शक्यता आहे. केंद्र शासनाकडून करवीर तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी गावागावांतील ग्रामस्थांतून होत आहे.

तालुक्यातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. शासकीय निधी अल्प मिळत आहे. डोंगरी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आवाज उठविणार.
- भिकाजी जाधव,-भाजप करवीर तालुका उपाध्यक्ष.

Web Title: Road condition in Karveer west

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.