हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: December 2, 2014 00:20 IST2014-12-01T23:05:20+5:302014-12-02T00:20:25+5:30
इचलकरंजीत रहदारीस अडचण : पादचारी हैराण; मांसाहारी गाड्यांमुळे महिला वर्ग त्रस्त

हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी
राजाराम पाटील - इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते आणि प्रमुख चौकांत हातगाड्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या आणि रहदारीच्या अडचणींबरोबर बोकाळलेली बेशिस्त, यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. विशेषत: मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांभोवती राजरोस चालणाऱ्या मद्यप्राशन करण्याच्या प्रवृत्तीमुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे.
शहरात करवीर नाका ते गांधी पुतळा-राजवाडा चौक मार्गे नदीवेस नाका, नदीवेस नाका-चांदणी चौक-संभाजी चौक मार्गे स्टेशन रोड, राजवाडा चौक-जुना सांगली नाका ते जय सांगली नाका असे मुख्य रस्ते आहेत, तर या रस्त्यावरील चौकांबरोबर तीन बत्ती चार रस्ता, औद्योगिक वसाहतीतील जुने बस स्टॅण्ड, थोरात चौक, विक्रमनगरमधील चौक आणि शहापूर गावातील चौक अशा विविध चौकांत अलीकडील वर्षा-दोन वर्षांत विविध प्रकारचे फळफळावळ, खाद्यपदार्थ, बेकरी माल विक्रीबरोबरच ‘चिकन ६५’ विक्रीच्या हातगाड्यांच्या संख्या वाढली आहे.
साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी नगरपालिकेकडे सुमारे २०० हातगाड्यांची नोंद होती. मात्र, अलीकडील काळात नगरपालिकेने या हातगाड्यांची कोणतीही नोंद ठेवली नाही. परिणामी कोणतेही बंधन नसल्याने हातगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. एका अनधिकृत सर्वेक्षणानुसार इचलकरंजीतील हातगाड्यांची संख्या दोन हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या हातगाड्यांनी आता तर हायस्कूल, महाविद्यालयांबरोबरच प्राथमिक शाळांच्या लगतच्या रस्त्यावर आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. शाळेलगतच्या गाड्यांवर अत्यंत हलक्या दर्जाच्या चॉकलेट व गोळ्या आणि खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ किंवा शितपेये विक्रीबाबत अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याचा परवाना आवश्यक आहे. तसेच त्यावर पालिकेचीही परवाना पद्धतीचे बंधन पाहिजे; मात्र फक्त साथीच्यावेळी जाग्या होणाऱ्या या दोन्ही खात्यांनी हातगाड्यांवर बंधन ठेवण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकांनाच अतिक्रमणांचा गराडा
शहरातील वाहतूक मुख्य वाहिन्या असलेल्या प्रमुख रस्त्यांवरील शाहू पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, डेक्कन मिल चौक, तीन बत्ती चौक, नदीवेस मरगुबाई मंदिर, जय सांगली नाका याठिकाणी हातगाड्यांचा गराडा वाहतुकीस धोकादायक ठरत आहे.
नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक नियंत्रण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत हातगाड्या हटवाव्यात म्हणजे त्याठिकाणची वाहतूक सुलभ होईल, अशी अपेक्षा वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
फेरीवाल्याचीच धमकी
फेरीवाल्याच्या गाड्यांसाठी बाजार करात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी डेक्कन स्पिनिंग परिसरातील एक शिष्टमंडळ अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी चर्चेत एका गाडीवाल्याने वाढलेला कर देतच नाही आणि गाडीला पण हात लावू देणार नाही, अशी धमकी दिल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता.
‘चिकन ६५’चा त्रास
शहरात विविध ठिकाणी असलेल्या चिकन ६५ च्या हातगाड्या सायंकाळी सुरू होतात. त्याठिकाणी सातत्याने दहा-बारा कुत्र्यांचा वावर असतो. तसेच रात्रीच्या अंधारात अशा काही गाड्यांवर मद्यपींची गर्दी असते. परिणामी त्याचा त्रास विशेषत: महिलांना अधिक होतो.
हातगाड्यांची हॉटेलवर संक्रांत
४हातगाड्यांना कोणताही परवाना नाही किंवा कराची आकारणी होत नाही. तसेच फर्निचर, सजावटीचा खर्च होत नाही.
४त्याचबरोबर कामगार, वीज बिल, जागा भाडे, स्वच्छता, साफसफाई अशा हॉटेलवाल्यांप्रमाणे कसलाही खर्च येत नसल्याने आणि हॉटेलपेक्षा स्वस्त दरात पदार्थ मिळत असल्याने इचलकरंजीत हातगाड्यांची चलती आहे, तर उपाहारगृहे, हॉटेल मात्र ओस पडली आहेत.