शिरोली नाक्यावर रस्ता रोखला

By Admin | Updated: October 15, 2014 00:30 IST2014-10-15T00:18:30+5:302014-10-15T00:30:26+5:30

टोलवसुलीचे पडसाद : अर्धा तास वाहतूक ठप्प; आय.आर.बी.च्या विरोधात घोषणाबाजी

Road blocked at Shiroli Naka | शिरोली नाक्यावर रस्ता रोखला

शिरोली नाक्यावर रस्ता रोखला

कोल्हापूर : टोलवसुलीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या विरोधी निकालाचे पडसाद आज, मंगळवारी कोल्हापुरात उमटले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आय.आर.बी. कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, शिरोली नाका परिसरात सायंकाळी समितीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला. उद्या, बुधवारी विधानसभेसाठी होणाऱ्या मतदान पेटीमधून राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांनी करीत तीव्र भावना व्यक्त केल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धांदल उडाली.
कोल्हापुरात आय.आर.बी. या कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रस्ते केले. मात्र, हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप टोलविरोधी कृती समितीने केला आहे. दरम्यान, याप्रश्नी न्यायालयात जनहित याचिका दाखल होत्या. आज, मंगळवारी न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. त्यामुळे सायंकाळी शिरोली टोलनाका परिसरात ‘पॅटको’समोर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. ‘आय.आर. बी.चा बोका, दिसेल तेथे ठोका’ अशा घोषणा देत कोणत्याही स्थितीत टोल न देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
आंदोलनात गोविंद पानसरे, बाबा पार्टे, अशोक पोवार, दिलीप पवार, दीपा पाटील, जयकुमार शिंदे, चंद्रकांत यादव, महादेव पाटील, रमेश मोरे, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

चार वर्षे टोल आंदोलन सुरू आहे. या शासनकर्त्यांना बुधवारी होणाऱ्या मतदानातून घालवा. आम्ही टोल घालविण्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे २० आॅक्टोबरपासून नवीन लोकप्रतिनिधींसमोर हे आंदोलन करणार आहोत.
- बाबा इंदुलकर,
टोलविरोधी कृती
समिती कार्यकर्ते.

जनतेच्या न्यायालयात टोलचा प्रश्न सोडवू. यापुढील काळातही हे आंदोलन सुरू राहील.
- दिलीप देसाई,
टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते.
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची 'धूम'
आंदोलनावेळी आंदोलक शंभर मीटरच्या पुढे थांबून राहिले असता एक आंदोलक टोलनाक्याच्या दिशेने गेला. त्यावेळी हा आंदोलक आपल्याकडे येतो, हे पाहून शिरोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलवसुली बंद करीत केबिनमधून धूम ठोकली.

Web Title: Road blocked at Shiroli Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.