कुरुंदवाड येथे शेतकऱ्यांनी अडविला कचरा डेपोचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:44+5:302021-05-12T04:25:44+5:30
कुरुंदवाड : येथील कचरा डेपोतील आगीमुळे झालेल्या ऊस पिकाची नुकसानभरपाई द्यावी, कचरा डेपोला संरक्षित भिंत बांधण्यात यावी, या मागणीसाठी ...

कुरुंदवाड येथे शेतकऱ्यांनी अडविला कचरा डेपोचा रस्ता
कुरुंदवाड : येथील कचरा डेपोतील आगीमुळे झालेल्या ऊस पिकाची नुकसानभरपाई द्यावी, कचरा डेपोला संरक्षित भिंत बांधण्यात यावी, या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कचरा डेपोकडे जाणारा रस्ताच अडविला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून शहरातील कचरा उठाव थांबल्याने कचऱ्याचे ढीग पडले आहेत. परिणामी दुर्गंधी पसरल्याने शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे.
पालिकेचा कचरा डेपो शहरातील मजरेवाडी हद्दीमध्ये आहे. कचरा डेपोला संरक्षित भिंत नसल्याने आठ दिवसांपूर्वी कचरा डेपोतील आग वाऱ्याने उडून नजीकच्या ऊस पिकात गेल्याने सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला होता. नुकसानग्रस्त व परिसरातील शेतकऱ्यांनी पालिकेवर मोर्चा काढून ऊस पिकाची नुकसानभरपाई मिळावी व कचरा डेपोला संरक्षित कुंपण करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
आठवडा उलटून गेला तरी पालिकेने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त कचरा डेपो परिसरातील शेतकऱ्यांनी कचरा डेपोकडे जाणारा रस्ता अडवून ठेवल्याने पालिका आरोग्य विभागाने शहरातील कचराच उठाव केला नाही. दोन दिवसांपासून कचरा उठाव थांबल्याने कचऱ्याचे ढीग पडले असून दुर्गंधी पसरल्याने शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंदोलनात डी. वाय. चव्हाण, सुरेश माळी, नितीन निटवे, रवींद्र कोकाटे, अवधूत भोसले, विनायक चव्हाण यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे शेतकऱ्यांनी कचरा डेपोकडे जाणारा रस्ता अडवून संताप व्यक्त केला.