पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रस्सीखेच...

By Admin | Updated: January 16, 2015 00:13 IST2015-01-16T00:05:54+5:302015-01-16T00:13:42+5:30

शाहूवाडी तालुका : प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाइकांनाच संचालकपदाच्या संधीची शक्यता

In rivalry with traditional competition ... | पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रस्सीखेच...

पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रस्सीखेच...

मलकापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम शाहूवाडी तालुक्यात देखील वाजू लागले आहेत. संघाच्या गेल्या अनेक निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाइकांनाच संचालकपद मिळाले आहे. पण गावात दूधसंस्था स्थापन करून नेत्यांचे राजकारण चालविणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र गोकुळ दूध संघाचे संचालकपद कधी तरी मिळणार का? असा दूध उत्पादकांचा सवाल आहे. असे असले तरी संचालकपदासाठी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, कॉँग्रेसचे करणसिंह गायकवाड यांच्यात खरी चुरस असणार आहे.गोकुळ दूध संघ स्थापनेत शाहूवाडी तालुक्यातील माजी संचालक (कै.) आनंदराव पाटील-भेडसगावकर, माजी आमदार स्व.संजयसिंह गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे. (कै.) आनंदराव पाटील-भेडसगावकर यांना माजी खासदार कै. उदयसिंगराव गायकवाड यांच्या आशीर्वादामुळे संचालकपद मिळाले. पंधरा वर्र्षाच्या कारकिर्दीत गोकुळ दूध संघाची घडी बसविण्यासाठी प्रयत्न केले. शाहूवाडी तालुक्याच्या वाड्या-वस्त्यांवर दूधसंस्था स्थापन केल्यामुळे दररोज तालुक्यातून दुधाची आवक वाढू लागली. काही दूधसंस्थांतील नेत्यांचा विरोध असताना आनंदराव पाटील यांनी तालुक्यातील गोगवे येथे दूध शीतकरण केंद्राची उभारणी केली. गोकुळ दूधसंघात (कै.) पाटील यांचा वेगळा दबदबा होता. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुत्र माजी सरपंच विजय पाटील यांना संचालक मंडळाने संधी द्यावयाची ठरवले; पण संचालकपदाने हुलकावणी दिली आहे.
माजी आमदार श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड यांना संचालकपदाची संधी मिळाल्यावर त्यांनी देखील आपल्या गटाच्या दूध संस्था स्थापन केल्या. आमदार पाटील यांनी दूध संघाचे जादा ठराव जमा करून आपल्या मातोश्री अनुराधा बाबासाहेब पाटील यांच्या गळ््यात संचालकपदाची माळ पडली. येथूनच तालुक्यात गोकुळचे राजकारण तापू लागले. तालुक्यात २३२ दूध संस्था आहेत, तर नवीन नऊ संस्थांची त्यामध्ये भर पडली आहे. २४१ दूध संस्था मतदानास पात्र आहेत.

सध्या तालुक्यात आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाकडे सर्र्वात जास्त ठराव आहेत. त्यापाठोपाठ करणसिंह गायकवाड यांच्या गटाकडे ठराव आहेत, तर मानसिंगराव गायकवाड व माजी आमदार विनय कोरे यांना मानणाऱ्या जनसुराज्यकडे गोकुळचे ठराव आहेत. आमदार सत्यजित पाटील गट व करणसिंह गायकवाड गट संचालकपदाचे मुख्य दावेदार आहेत. तालुक्यात आमदार पाटील व मानसिंगराव गायकवाड गटाची युती आहे. मानसिंगराव गायकवाड गट गोकुळसाठी इच्छुक नाही. त्यामुळे त्या गटाचे ठराव आमदार पाटील गटाला मिळण्याची शक्यता आहेत. तर करणसिंह गायकवाड व जनसुराज्य पक्षाची युती झाल्यास जनसुराज्य पक्षाकडे असणारे ठराव करणसिंह गायकवाड गटाला मिळतील. या दोन्ही गटातच गोकुळच्या संचालकपदासाठी संघर्ष होणार आहे. गोकुळच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या कै. आनंदराव पाटील भेडसगावकर यांचे चिरंजीव माजी सरपंच विजय पाटील यांना संचालकपद मिळण्यासाठी जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Web Title: In rivalry with traditional competition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.