कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:36+5:302021-06-28T04:17:36+5:30
कोल्हापूर : कोरोनातून सावरलेल्या बालकांमध्ये एमएसआयसी म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लेमेंटरी सिंड्रोमचा धोका आहे. यासंबंधी आरोग्य प्रशासनातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...

कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका
कोल्हापूर : कोरोनातून सावरलेल्या बालकांमध्ये एमएसआयसी म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लेमेंटरी सिंड्रोमचा धोका आहे. यासंबंधी आरोग्य प्रशासनातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
कोरोनाची बाधा लहान बालकांनाही होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. तिसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने बालकांना बाधा होईल, अशी शक्यता वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारचे आरोग्य प्रशासन बाधित बालकांवर उपचार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करत आहे. आधुनिक उपचार पध्दतीसंबंधीही माहिती घेतली जात आहे. दरम्यान, कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका निर्माण होत आहे. या आजाराची तपासणी आणि उपचारासंबंधी तज्ज्ञांतर्फे गाव पातळीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रूग्ण : १,४७,१५९
कोरोनावर मात केलेले रूग्ण : १,३२,९५४
उपचार घेत असलेले रूग्ण : ९,६५३
एकूण मृत्यू : ४,५५२
जिल्ह्यात एकूण ४,५५२ बालकांना कोरोना
जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५५२ बालकांना कोरोना झाला आहे. यातील बहुतांशी बालके बरी झाली आहेत. तिसऱ्या लाटेत बालके अधिक बाधित झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सरकारी दवाखान्यात वेगळी व्यवस्था करण्यात येत आहे.
ही घ्या काळजी
१ मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नये, कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे दाखवावे. कोरोनातून बाहेर पडलेल्या बालकांकडे विशेष लक्ष द्यावे.
२ बालकाला वारंवार ताप आल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नये.
३ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत. कोणत्याही साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये.
एमएसआयसीची अशी आहेत लक्षणे
१ मुलांना खूप ताप येणे, पाच दिवसांपर्यंत कमी न होणे
२ मुलांचे डोळे लाल होणे
३ त्वचेवर रॅशेस पडणे
४ मळमळ, उलट्या होणे
५ मुलांच्या सतत पोटात दुखणे
६ तोंड येणे, अंगावर पुरळ येणे
कोट
बालकांना सातत्याने ताप येणे, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे आदी लक्षणे एमएसआयसी आजाराची आहेत. ही लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नये. लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजारावर उपचार करण्यासंबंधी आरोग्य कर्मचारी, आशांना प्रशिक्षण दिले जात आहे.
- डॉ. संगीता कुंभोजकर, बालरोगतज्ज्ञ, सीपीआर