गॅस सिलिंडरचा दर वाढता वाढे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:05+5:302021-08-20T04:30:05+5:30

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आठ महिन्यांत तब्बल दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सिलिंडरच्या दरात २५ ...

Rising gas cylinder rates ... | गॅस सिलिंडरचा दर वाढता वाढे...

गॅस सिलिंडरचा दर वाढता वाढे...

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आठ महिन्यांत तब्बल दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली असून यामुळे ग्राहकांना सिलिंडरसाठी ८६५ रुपये मोजावे लागणार आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दर सातत्याने वाढ होत असून पाच वर्षांपूर्वी ३०० ते ४०० रुपयांना मिळत असलेल्या सिलिंडरचा दर आता ८६५ रुपयांवर येऊन पोहोचला आहे. सुरुवातीला कमी पैशात गॅस सिलिंडर महिलांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे घराघरात गॅसचा वापर सुरू झाला. स्टोव्हचा वापर बंद झाला, केरोसीन मिळेनासे झाले. लोकांना गॅसची सवय लावली आणि आता त्याचे दर इतके वाढवून ठेवले आहेत की, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना ते परवडेनासे झाले आहेत. गॅस ही गरज अशी आहे की, ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. अशी २५ रुपयांची दरवाढ सुरू ठेवली तर पुढच्या वर्षी सिलिंडर हजार रुपयांनाच मिळणार, अशी स्थिती आहे. ही जीवनावश्यक बाब असल्याने सिलिंडरचे दर कमी करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

---

महिना : गॅस सिलिंडरचा दर

१ जानेवारी २०२१ : ६९७

४ फेब्रुवारी : ७२२

१५ फेब्रुवारी : ७७२

२५ फेब्रुवारी : ७९७

१ मार्च : ८२२

एप्रिल, मे, जून : ८१२

जुलै : ८३८

ऑगस्ट : ८६५

----

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच

गेल्यावर्षी मे महिन्यापासून केंद्र शासनाने गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद केली आहे. एकीकडे सबसिडी बंद दुसरीकडे दर महिन्याला सातत्याने होणारी दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. वाजत गाजत उज्ज्वला गॅस योजना राबवली गेली आता सिलिंडरचे दर वाढवून ठेवले. हे असेच सुरू राहिले तर पुढील वर्षभराच्या आतच सिलिंडर हजार रुपयांना होणार, हे निश्चित.

--

शहरात चुली कशा पेटवायच्या?

आमचं चार माणसांचं कुटुंब आहे. दर महिन्याला एक गॅस सिलिंडर लागतो. एक शिल्लक ठेवावा लागतो. म्हणजे महिन्याला १७०० रुपये मोजावे लागतात. स्टोव्हची साेय नाही, शहरात लाकडं तर कुठून आणायची. गॅस ही अशी गोष्ट आहे की त्याशिवाय पर्याय नाही. याचा विचार करून शासनाने दर कमी करायला पाहिजेत. -

दीपाली प्रभू (शिवाजी पेठ)

---

माझा नवरा गवंडी काम करतोय, मी एक-दोन ठिकाणी घरकामाला जाते. दोघांच्या पगारातील ९०० रुपये गॅस सिलिंडरसाठी ठेवावे लागतात. उरलेल्या पैशांत महिन्याच्या गरजा कशा भागवायच्या, गॅस सिलिंडर, धान्य, डाळी, दूध, पेट्रोल, डिझेल सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून ठेवलेत. त्यात कोरोना, महापूर सगळीकडूनच संकट येताना कशा कशाचा म्हणून सामना करायचा.

-लक्ष्मी मिराशी (पाचगाव)

---

Web Title: Rising gas cylinder rates ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.