नववर्षात वाहन उद्योगांतून दरवाढीचा धूर

By Admin | Updated: January 2, 2015 00:24 IST2015-01-02T00:00:41+5:302015-01-02T00:24:31+5:30

चार टक्के सवलतीची मुदत संपली : जानेवारीपासून अबकारी कर १२ टक्क्यांप्रमाणे

Rising festivals in the new year's auto industry | नववर्षात वाहन उद्योगांतून दरवाढीचा धूर

नववर्षात वाहन उद्योगांतून दरवाढीचा धूर

संदीप खवळे - कोल्हापूर -केंद्र सरकारने कार, एसयूव्ही, एमयूव्ही व दुचाकीवर जूनमध्ये अबकारी करात दिलेल्या चार टक्के सवलतीची मुदत ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपलेली आहे. १ जानेवारी २०१५ पासून अबकारी कराची आकारणी पूर्वीप्रमाणे १२ टक्क्यांनी लागू असल्यामुळे नववर्षात वाहन उद्योगातून दरवाढीचा धूर निघणार आहे़ नवीन वर्षात वाहनांच्या किमतींत वाढ होणार असल्यामुळे मंदीच्या गर्तेत असलेल्या वाहन उद्योगाच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या वर्षापासून वाहन उद्योगावर मंदीचे सावट आहे़ देशातील वाहन उद्योगाला सावरण्यासाठी अंतरिम बटेजमध्ये ‘संपुआ’चे पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांनी वाहनावरील अबकारी करात चार टक्क्यांची सवलत दिली होती़ भाजपचे सरकार केंद्रात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जूनमध्ये अबकारी करातील सवलतीची मर्यादा ३१ डिसेंबर, २०१४ पर्यंत वाढवून दिलेली होती़ त्यामुळे सर्व प्रकारच्या एमयूव्ही आणि एसयूव्ही तसेच दुचाकी वाहनांसाठी अबकारी कर आठ टक्के होता़; पण हा कर पूर्वीप्रमाणे १२ टक्क्यांवर आणल्यामुळे वाहन बाजारपेठेला शॉक बसणार आहे़
सन २०१३-१४ पासूनच वाहन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे़ त्यामुळे वाहन क्षेत्रातील विविध कंपन्यांनी अबकारी करात सवलत देण्याची मागणी उद्योजकांना केली होती़
त्यानुसार चार टक्क्यांची सवलत देण्यात आली होती़ त्यामुळे वाहन उद्योगास किरकोळ प्रमाणात का असेना, पण चालना मिळत होती़ पेट्रोल-डिझलचे दर बरेच खाली असल्यामुळे वाहन उद्योगाला चालना मिळण्यासाठी अबकारी करातील सूट किफायतशीर ठरली असता़; पण या कराचा दर पूर्ववत केल्यामुळे या व्यवसायाचे कंबरडे मोडणार आहे़
कोल्हापुरात सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या काळात विक्री झालेल्या एसयूव्ही, एमयूव्ही आणि कारची संख्या ५२५१ इतकी होती़; पण मंदीमुळे ही संख्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४७४७ पर्यंत आली असून, हे प्रमाण १० टक्के घट दर्शविते़ अशी परिस्थिती असताना आता अबकारी कर आठवरून बारा टक्क्यांवर गेल्यामुळे सुमो, बोलेरो, झायलो, तवेरा, रेनॉल्ट, कॅप्टिव्हा यांसह अन्य एसयूव्ही आणि एमयूव्ही कारच्या किमतींत वाढ होणार आहे, असे मत युनिक आॅटोमोबाईलचे गु्रप हेड सुधर्म वाझे यांनी व्यक्त केले़

खरेदीला लगाम
कोल्हापूरकरांचे गाड्यांचे प्रेम सर्वश्रुत आहे, असे म्हटले जाते़; पण एप्रिल ते २०१४-१५ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एसयूव्ही आणि एमयूव्ही प्रकारांतील केवळ ४७४७ गाड्यांची विक्री झाली आहे़ सन २०१३ ते १४ मध्ये याच कालावधीत ५२५१ कारची विक्री झाली होती़

Web Title: Rising festivals in the new year's auto industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.