पाटील-महाडिक गटात दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:16 IST2021-02-22T04:16:02+5:302021-02-22T04:16:02+5:30
प्रभाग क्रमांक ७४, साळोखेनगर, विद्यमान नगरसेविका - प्रतीक्षा पाटील, आताचे आरक्षण : सर्वसाधारण अमर पाटील : कळंबा : ...

पाटील-महाडिक गटात दंगल
प्रभाग क्रमांक ७४, साळोखेनगर, विद्यमान नगरसेविका - प्रतीक्षा पाटील, आताचे आरक्षण : सर्वसाधारण
अमर पाटील : कळंबा
: प्रभाग क्रमांक ७४ साळोखेनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण झाल्याने या प्रभागातून पालिकेत जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यावेळी काँग्रेस व भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार आहे. विशेष म्हणजे या प्रभागात उमेदवारांपेक्षा गटांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने पालकमंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. वीस लहान-मोठ्या कॉलन्यांत विस्तारलेल्या या प्रभागात मध्यमवर्गीय वस्तीचे प्राबल्य असून जास्त नागरी वस्तीच्या मोहिते कॉलनी, साळोखेनगर व हडको कॉलनीतील मतदान निर्णायक ठरते. २००५ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या सुमन सूर्यवंशी यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार अलका पाटील निवडून आल्या होत्या. २०१० साली अपक्ष उमेदवार धीरज पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश गायकवाड विजयी झाले होते.
गतवेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. यात काँग्रेसच्या प्रतीक्षा पाटील यांनी शिवसेनेच्या श्वेता बकरे यांचा २७७ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून संजीवनी शेटे आणि शिल्पा तेंडुलकर यांच्यात चुरस लागली होती. आयत्यावेळी संजीवनी शेटे यांना पक्षाने झुकते माप दिल्याने शिल्पा तेंडुलकर अपक्ष रिंगणात उतरल्या होत्या. भाजपच्या मतविभागणीचा फायदा काँग्रेसच्या प्रतीक्षा पाटील यांना झाला, तर शिवसेनेेच्या श्वेता बकरे यांना दोन नंबरची मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत पाटील घराण्यात नगरसेवकपद कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आई अलका पाटील, पत्नी प्रतीक्षा पाटील नगरसेविका झाल्यानंतर स्वतः धीरज पाटील यावेळी दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. याखेरीज प्रशांत शेटे, अभय तेंडुलकर, युवराज साबळे, विजय जाधव, सुनील शिपुगडे, संजय साळोखे, बजरंग देवकर, सुजय पोवार, महेश देसाई, संजय पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी खरी लढत काँग्रेस- भाजपमध्येच होणार हे निश्चित आहे.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : प्रतीक्षा पाटील काँग्रेस- ११६०, श्वेता बकरे शिवसेना- ८८३, संजीवनी शेटे भाजप - ७३९, शिल्पा तेंडुलकर अपक्ष ६०२, वृंदा काळोलीकर - राष्ट्रवादी काँग्रेस- २३७.
प्रभागातील समस्या :
१) प्रभागातील मुख्य डीपी रस्ते आजही अविकसित २) साई मंदिर चौकालगतच्या बगीचासाठी आरक्षित जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या खाऊगल्लीने वाहतूक कोंडी व अपघात नित्याचेच ३) बंद साळोखेनगर पोलीस चौकीने गुन्ह्यात वाढ ४) सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव ५) नागरी वस्तीत शिरणारे पावसाचे पाणी ६) पाणी सोडण्याच्या वेळेतील अनियमितता.
सोडवलेले प्रश्न : १) प्रभागातील अंतर्गत रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी मार्गी २) त्रिमूर्ती उद्याने येथे ४५ लाखांच्या ऑक्सिजन पार्कची उभारणी ३) मोहिते कॉलनी येथे दोन एकरात ९६ लाखांच्या जॉगिंग ट्रॅकची उभारणी ४) संपूर्ण प्रभागात एलईडी पथदिवे ५) स्वखर्चाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास बैठकीची लोखंडी बाकडी बसवली.
६) बहुतांश आरक्षित जागा विविध कारणास्तव विकसित ७) हडको कॉलनी व मोरे माने नगरचा कित्येक वर्षे प्रलंबित ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला.
कोट :
गेल्या पाच वर्षात पाच कोटींची परिणामकारक विकासकामे प्रभागात केली आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या पालिका विकास निधीमधून बहुतांश मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. प्रतीक्षा पाटील, नगरसेविका
फोटो: प्रभाग क्रमांक ७०
प्रभागातील मुख्य डीपी रस्ते आजही अविकसित
आहेत.