रंकाळा निसर्ग माहिती केंद्राची दुरवस्था

By Admin | Updated: November 10, 2014 00:45 IST2014-11-10T00:40:08+5:302014-11-10T00:45:34+5:30

अवैध धंद्यांना ऊत : इमारतीच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीच नाही

Rinkala Nature Information Center | रंकाळा निसर्ग माहिती केंद्राची दुरवस्था

रंकाळा निसर्ग माहिती केंद्राची दुरवस्था

कळंबा : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा रंकाळ तलाव आज प्रदूषणामुळे अंतिम घटका मोजत आहे. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना टप्पा-१ च्या केंद्र शासनाच्या अनुदानातून पालिकेस आठ कोटी ६६ लाखांचे विशेष अनुदान रंकाळा तलाव संवर्धनासाठी मंजूर आहे.
या योजनेतून तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन, गणेशकुंड, संरक्षक भिंत, उद्यान व बगीचा विकास ही कामे करण्यात आली. याच अनुदानातून चार वर्षांपूर्वी सन २०१० ला ३५ लाख रुपये खर्च करून ‘निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्रा’ची रंकाळा इराणी खणीलगत भव्य इमारत उभारण्यात आली.
निसर्ग, पशुपक्षी आणि वातावरणाची माहिती मिळावी म्हणून या केंद्राची उभारणी करण्यात आली, परंतु गेली तीन वर्षे इमारत वापराविना पडून आहे. परिसरात गारवेल व अन्य काटेरी वनस्पतींनी विळखा दिला आहे. स्वच्छतागृहांचे दरवाजे मोडकळीस येऊन परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुल, पत्त्यांचे डाव, जेवणावळीसाठीच जास्त होत आहे.
इमारतीच्या देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त नाहीत. पालिका इस्टेट विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ना निसर्ग, ना माहिती, ना कोणतेच प्रशिक्षण, अशी केंद्राची आजची अवस्था झाली आहे.

वापराविना असलेल्या केंद्र व परिसरातील निसर्ग संवर्धनाची जबाबदारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी संस्था, शाळांतील विज्ञान व पर्यावरण मंडळांना दिल्यास किमान परिसर संवर्धन होईल. केंद्रातील बंद खोल्यांचा विरंगुळा केंद्र म्हणून वापर झाल्यास इमारतीचा वापर होऊन परिसरातील गैरव्यवहारास आळा बसेल.
- प्रकाश आळतेकर, व्यावसायिक

हैदराबाद येथील हुसेनसागर तलावाची रंकाळ्यासारखी अवस्था झाली होती. जपानच्या एन. जे. एस. इंडिया कंपनीने तलावास गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. त्याच कंपनीच्या सहकार्याने केंद्र सरकारकडून टप्पा अनुदानातून या केंद्रास व रंकाळ्यास गतवैभव लवकरच प्राप्त करून देऊ. - मनीष पवार, जलअभियंता


केंद्राच्या दोन खोल्या वापराविना बंद, तर एका खोलीत व्हाईट आर्मीच्या बोटी, औषधे, कर्मचारी निवासस्थान व परिसरात गाड्या लावण्यात आल्या आहेत.

Web Title: Rinkala Nature Information Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.