रंकाळा तलावातील गाळाचे होणार परीक्षण
By Admin | Updated: July 8, 2014 01:05 IST2014-07-08T01:05:01+5:302014-07-08T01:05:32+5:30
पाईपलाईनमधील गाळ काढण्यांस सुरुवात : दोन दिवसांत पुन्हा सांडपाणी दुधाळी नाल्यात

रंकाळा तलावातील गाळाचे होणार परीक्षण
कोल्हापूर : रंकाळ्यातील हिरवे झालेले पाणी नैसर्गिकरीत्याच शुद्ध होणार आहे. दोन व्हॉल्व्हमधून बाहेर जाणारे पाणी व आत येणारे दूषित पाणी याचे प्रमाण एकच असल्याने पाण्याची पातळी ‘जैसे थे’च आहे. दुधाळी नाल्याकडे वळविलेल्या ड्रेनेज लाईन स्वच्छता करण्याचे काम आज, सोमवारपासून महापालिकेने हाती घेतले. येत्या दोन दिवसांत रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबणार असले तरी गाळातील सांडपाण्याच्या अंशामुळे पुन्हा उन्हाळ्यात पाण्याचा रंग बदलू शकतो. यासाठी रंकाळ्यातील गाळाचा ‘बॅरोमेट्रिक सर्व्हे’ केला जाणार असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या परताळा या ठिकाणी सानेगुरुजी वसाहतीतून आलेले चार लाख लिटर सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत होते, तर शाम सोसायटी नाल्यातून आलेले तब्बल १० एमएलडी पाणी दुसऱ्या बाजूने रंकाळ्यात मिसळते. दोन्ही ठिकाणचे पाणी एकत्र करून ड्रेनेज लाईनद्वारे दुधाळी नाल्यात सोडण्यात आले. हे पाणी दुधाळी येथे २६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सोडले जाणार आहे. मात्र, प्राथमिक चाचणी परीक्षेतच ही ड्रेनेजलाईन नापास झाली. गाळ साचल्याने पुन्हा सांडपाणी रंकाळ्यात सोडले जात आहे. आज ठेकेदार कंपनीने पाईप स्वच्छतेचे काम हाती घेतले. उद्या, मंगळवारी पाईपलाईन स्वच्छ होण्याची शक्यता असल्याची माहिती उपजलअभियंता एस. बी. कुलकर्णी यांनी दिली. गाळातील सांडपाण्याच्या अंशामुळे रंकाळ्याचे पाणी वारंवार रंग बदलून दुर्गंधीयुक्त होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात गाळाची शास्त्रीय चाचणी केली जाणार आहे.