विघ्नसंतोषी लोकांमुळेच समाजात तेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:40+5:302021-09-25T04:25:40+5:30
शिरोली : टोप गावातील काही विघ्नसंतोषी लोक मराठा आणि वडार समाजात जातिवाचक तेढ निर्माण करत असून, शासकीय लोकांना हाताशी ...

विघ्नसंतोषी लोकांमुळेच समाजात तेढ
शिरोली :
टोप गावातील काही विघ्नसंतोषी लोक मराठा आणि वडार समाजात जातिवाचक तेढ निर्माण करत असून, शासकीय लोकांना हाताशी धरून टोप (ता. हातकणंगले) गट नंबर (६३० अ) मध्ये अनधिकृत दगड उत्खनन करून कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवणारे हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील, विठ्ठलपंत पाटील, महेश भोसले, प्रकाश पाटील, योगेश भोसले, दादासो भोसले, सागर भोसले यांची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी वडार समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, प्रांताधिकारी विकास खरात, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांच्याकडे करण्यात येणार आहे. टोपमधील गट नंबर १०७४ मध्ये सोमवारी (दि.२०) वडार समाजाचे लोक दगड उत्खनन करायला गेले असता या ठिकाणी टोप दक्षिणवाडीतील लोकांनी विरोध केला. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन्ही बाजूचे काही जण जखमी झाले; पण वाद पोलीस ठाण्यापर्यंत आलाच नाही. बाहेरच हा वाद मिटविला, मात्र यामुळे गावात गेली तीन दिवस धुसफूस सुरू आहे. शासनाने वडार समाजाला जगविण्यासाठी दगड उत्खनन करायला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वडार समाजाने केली आहे. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य रेखा चौगले, माजी उपसरपंच बापूसो पोवार, वडार समाज अध्यक्ष रंगराव भोसले, अविनाश कलकुटगी, अर्जुन पोवार, सतीश नलवडे, प्रभाकर नलवडे यांच्यासह १९ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.