खासगी बससह रिक्षाही जागेवरच ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:31+5:302021-05-17T04:21:31+5:30
कोल्हापूर : आठ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे रविवारपासून कोल्हापुरातून बाहेर जिल्ह्यासह परराज्यात होणारी खासगी आराम बस वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली ...

खासगी बससह रिक्षाही जागेवरच ठप्प
कोल्हापूर : आठ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे रविवारपासून कोल्हापुरातून बाहेर जिल्ह्यासह परराज्यात होणारी खासगी आराम बस वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे सुमारे ५०० खासगी बस व जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक रिक्षा व्यवसाय ठप्प झाला.
जिल्ह्यातून नियमित पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी मार्गावर सुमारे ५०० हून अधिक खासगी बस रोज धावत होत्या. मात्र, पहिल्या लाॅकडाऊननंतर त्यात घट झाली. सद्य:स्थितीतही केवळ ६० बस शनिवारी रात्रीपर्यंत बाहेर जात होत्या. मात्र, त्यांनतर पुन्हा आठ दिवसांसाठी जिल्ह्यात पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शनिवारी रात्री दोन खासगी बस पुण्याकडे रवाना होणार होत्या. मात्र, त्यातील १२ जणांना प्रशासनाने योग्य कारण नसल्यामुळे ई-पास नाकारला. त्यामुळे याही बस रद्द करण्यात आल्या.
जिल्ह्यात एस.टी.सह, खासगी प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यावर निर्भर असणारा रिक्षा व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवस मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकही रिक्षा दिसली नाही. दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेस आल्यानंतर त्यातून उतरलेल्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी एकही वाहन मिळाले नाही. अनेकांना पायी प्रवास करावा लागला. तर ज्यांना ग्रामीण भागात जायचे होते, असे ई-पास धारकही नातेवाइकांची वाट पाहत होते.
खासगी बस व्यवसायावर हजारो जण निर्भर
जिल्ह्यात २५०० हून अधिक खासगी बस आहेत. त्यापैकी पहिल्या लाॅकडाऊननंतर रस्त्यावर केवळ ५०० च्या आसपास धावत आहेत. अन्य बस व्यावसायिकांना बँकांसह विमा, चालक पगार, देखभाल दुरुस्ती आदी खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांना हा व्यवसायाच बंद केला आहे. या व्यवसायावर १५०० हून अधिक मेकॅनिक, तर २०० हून अधिक ऑटोमोबाइल दुकाने, टायर व्यावसायिक, डिझेल पंपचालक आदी अवलंबून आहेत. असा हजारो जणांचा संसार या व्यवसायावर निर्भर आहे. कोल्हापुरातील या बस बंदमुळे व्यावसायिकांना सुमारे ३ कोटींचा फटका बसणार आहे.
प्रतिक्रिया
जवळचा नातेवाईक मृत झाल्यानंतर किंवा परदेशात फ्लाइट असतानाही योग्य कारण नसल्याचे सांगून ई-पास नाकारला जात आहे. त्यात बसनाही परवानगी नाही. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. याचा विचार शासनाने करणे जरूरीचे आहे.
-महेश गोवेकर, उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कार ऑपरेटर्स असोसिएशन
प्रतिक्रिया
रिक्षा व्यावसायिकांना अटी, शर्तीवर शहरातून अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देणे गरजेचे होते. रेल्वेतून आलेल्या प्रवाशांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय जिल्ह्यात रिक्षा वाहतुक ठप्प असल्याने सुमारे दहा लाखांचे दिवसाचे नुकसानही झाले आहे.
चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतुक सेना
फोटो : १६०५२०२१-कोल-प्रवासी
ओळी : राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हाॅटेल परिसरातील बस थांब्यावर रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी बसची वाट पाहत बसले होते.
(छाया : नसीर अत्तार)