रिक्षाचालकाची मुलगी सीमा सुरक्षा दलात भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:14+5:302021-02-05T07:05:14+5:30
सागर शिंदे दिंडनेर्ली : गिरगाव (ता. करवीर) येथील मयुरी पोवार या रिक्षाचालकाच्या मुलीने सीमा सुरक्षा दलात भरती होत ...

रिक्षाचालकाची मुलगी सीमा सुरक्षा दलात भरती
सागर शिंदे
दिंडनेर्ली : गिरगाव (ता. करवीर) येथील मयुरी पोवार या रिक्षाचालकाच्या मुलीने सीमा सुरक्षा दलात भरती होत गावाच्या सैनिकी परंपरेत मानाचा तुरा जोडला आहे. गिरगावला सैनिक सेवेची परंपरा लाभली आहे. हे गावच सैनिक गिरगाव म्हणून नावारुपाला आले आहे. भारतीय लष्करात गिरगावातील अनेक सैनिक देशसेवा बजावून आलेले आहेत. तरुण विविध पदावर देशसेवा करीत आहेत.
क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांच्यापासून प्रेरणा घेत गावाच्या मातीतच देशसेवेचे बाळकडू रुजले असल्यामुळे येथील मुलीही तरुणा पाठोपाठ लष्करात दाखल होण्यासाठी प्रयत्नशील असतात. रिक्षाचालक साताप्पा दुर्गाप्पा पोवार यांची मुलगी मयुरी हिने देखील महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच लष्करात दाखल होण्यासाठी प्रयत्न चालू केले.
घरची परिस्थिती बेताची असताना देखील तिने आपले प्रयत्न सोडले नाहीत. वडिलांनी तिला चार महिन्यासाठी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठविले.
पहिल्या प्रयत्नात अपयश आले पण दुसऱ्या प्रयत्नात तिच्या प्रामाणिक कष्टाला यश आले. मयुरीचा लहान भाऊ देखील पोलीस व लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निकाल समजल्याने पोवार कुटुंबीयासह गिरगाव ग्रामस्थात आनंदाचे वातावरण आहे.
मुलींनी मयुरीच्या प्रयत्नातून बोध घ्यावा .कला , खेळ यासह विविध छंद जोपासत विविध क्षेत्रात भरारी घ्यावी. पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही राहिल्यास संपत्ती निर्माण करणारी संतती घडेल. रुपेश पाटील
संभाजी ब्रिगेड
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष