रिक्षा संघटनांत फूट
By Admin | Updated: August 26, 2015 00:09 IST2015-08-26T00:09:34+5:302015-08-26T00:09:34+5:30
भाडेवाढीची ‘कॉमन मॅन’ची मागणी : जिल्हा संघर्ष समितीचा विरोध

रिक्षा संघटनांत फूट
कोल्हापूर : पेट्रोल व डिझेलच्या किमतीतील चढ-उतार होत आहे. यावरून रिक्षांच्या प्रवासी भाडेवाढबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनेत फूट पडली आहे. कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघटनेच्यावतीने महागाईमुळे रिक्षाच्या प्रवासी भाड्यात वाढ करावी, अशी मागणी केली आहे. तर जिल्हा अॅटो संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील ११ संघटनांनी ही प्रवासी भाडेवाढ करू नये, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन दोन्हीही संघटनांनी उपप्रादेशिक अधिकारी राजू वर्मा यांच्याकडे केली. यामुळे भाडेवाढबाबत काही रिक्षाचालकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने वर्मा यांची भेट घेतली. अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, महागाई वाढत आहे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना महागाई निर्देशांकाच्या तुलनेत महागाई भत्त्यात वाढ होत असते, परंतु रिक्षा हा सार्वजनिक वाहतुकीचा घटक असूनदेखील उर्वरित महाराष्ट्रात रिक्षा भाडेवाढ होऊन देखील कोल्हापुरात भाडेवाढ झाली नाही.
कोल्हापुरातील जनतेला आर्थिक भुर्दंडात न टाकणारी भाडेवाढ त्वरित करावी. यासह मीटर दरवाढ पहिल्या टप्प्याकरिता वीस व पुढील टप्प्यासाठी पंधरा रुपये करावे. अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, तसेच जुन्या परमिटांचे नूतनीकरण करून द्याव, अशी मागणी यावेळी केली. शिष्ठमंडळात अविनाश दिंडे, नितीन दुधगांवकर, श्रीकांत पाटील, संजय भोळे, जाफर मुजावर, राजू कांबळे, शकील महात, नरेंद्र पाटील, सूर्यकांत पाटोळे, वासीम पठाण, अनिल मांडरे, प्रफुल्ल काळे
आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाडेवाढ नको
पेट्रोल व डिझेल यांचे वारंवार कमी होणारे भाव आणि नवीन केएमटी बसेस आल्यामुळे प्रवासी वाहतुकीची स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत रिक्षा व्यवसाय टिकविणे कठीण झाले आहे. त्यामुळे भाडेवाढ मागणे हे प्रवासी आणि रिक्षा व्यावसायिकांच्या दृष्टीने अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे कोणतीही भाडेवाढ करू नये, अशी मागणी जिल्हा अॅटो रिक्षा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ११ रिक्षा संघटनांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. यामध्ये चालक-मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, काँग्रेस आय अॅटो, विद्यार्थी वाहतूक संघ, आदर्श अॅटो, शिवशक्ती अॅटो संघ, शाहू रिक्षा मित्र मंडळ, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान रिक्षा संघटना यांचा समावेश आहे.