बांबवडेत सुरू होतेय भात खरेदी केंद्र
By Admin | Updated: December 7, 2014 00:57 IST2014-12-07T00:31:07+5:302014-12-07T00:57:54+5:30
खासगी गोडावून उपलब्ध : ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने प्रशासनाला जाग

बांबवडेत सुरू होतेय भात खरेदी केंद्र
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात भात ओतून आंदोलन केल्यामुळे प्रशासनाला जाग आली. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडतर्फे पुढाकार घेवून बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे सोमवारी, (दि. ८) शासनाचे भात खरेदी केंद्र सुरू करणार आहे.
शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार भात पिकाच्या पट्ट्यामध्ये भात खरेदी केंद्र होणे आवश्यक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केल्यामुळे आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मार्केटिंग फेडरेशनला सूचना दिली. चंदगड तालुक्यातील यशवंतनगर येथे केंद्र सुरू झाले. शाहूवाडी तालुक्यात केंद्र सुरू झाले नाही. यामुळे शेतकरी व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. आज फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी बांबवडेत सोमवारी केंद्र सुरू करण्याची पूर्वतयारी केली. खासगी गोडावून मिळाले आहे.