रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ‘पीएफ’ रखडला
By Admin | Updated: July 17, 2015 00:05 IST2015-07-17T00:05:32+5:302015-07-17T00:05:32+5:30
आस्थापनाची दिरंगाई : ९७० कर्मचाऱ्यांना फटका--लोकमत हेल्पलाईन न्यूज

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ‘पीएफ’ रखडला
कोल्हापूर : महापालिकेकडे रोजंदारी व ठोक मानधनावर असलेल्या ९७० कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाकडे जमा झालेली नाही. पगारातून दरमहा १२ टक्के कपात होणारी रक्कम नेमकी कुठे जाते, याची माहिती तरी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी अनिल जाधव यांनी ‘लोकमत’कडे हेल्पलाईनद्वारे गुरुवारी केली. याबाबत महापालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता, निधीकडे पैसा जमा करणे सुरू असून, येत्या दोन महिन्यांत सर्व पैसे जमा होतील, असे सांगण्यात आले.
महापालिकेकडे रोजंदारी व ठोक मानधनावर ९७० कर्मचारी कामावर आहेत. महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून या कर्मचाऱ्यांतून दरमहा कपात होणारी १२ टक्के भविष्य निर्वाह निधीची रक्कम व महापालिकेच्या वाट्याची १२ टक्के अशी २४ टक्के रक्कम संबंधित विभागाकडे जमाच केलेली नाही. कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर १६ फेब्रुवारीला सात दिवसांची नोटीसही बजावली. मात्र, मनपा प्रशासनाने हालचाल केलीच नाही.
भविष्य निधी संघटनेच्या कारवाईच्या तगाद्याने आता प्रशासनाने भविष्य निर्वाहचे पैसे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. आस्थापना विभागाकडे या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती अनेकवेळा सांगूनही दिली गेली नाही. जन्म दिनांक, कामावर रूजू दिनांक, आदी अत्यंत साधी कार्यालयीन माहितीही देण्यास आस्थापना विभागाने कुचराई केली. परिणामी गेली दोन वर्षे पैशांची मासिक पगारातून वजावट होऊनही ते भविष्य निर्वाह निधीकडे जमा झाले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचा तपशील मागण्यास सुरुवात केल्याने प्रशासन हडबडल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
आस्थापनातील त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे जमा होऊन संबंधित खात्याकडे वर्ग करता आले नाहीत. गेल्या महिन्याभरात एक कोटी ५९ लाख व एक कोटी २५ लाख रुपये असे दोन टप्प्यांत हे पैसे निधीकडे जमा केले आहेत. आता फक्त मागील तीन महिन्यांचे ४५ लाख रुपये जमा करणे बाकी आहेत.
- संजय सरनाईक,
मुख्य लेखाधिकारी, महापालिका
आमच्या पगारातून कपात होणारे पैसे नेमके कुठे जातात याची माहिती तोंडी व लेखी मागूनही दिली जात नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीकडेही याबाबत दाद मागितली. कर्मचाऱ्यांच्या पैशांचा हिशेब किंवा खात्यांचा तपशील वेळोवेळी मिळाला पाहिजे.
- अनिल जाधव,
पवडी रोजंदारी कर्मचारी, महापालिका