क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’
By Admin | Updated: July 27, 2014 01:04 IST2014-07-27T01:04:59+5:302014-07-27T01:04:59+5:30
टोलप्रश्न; धरणे धरणार; आमरण उपोषण; जलसमाधी घेण्याचा इशारा

क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’
कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याच्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारने ८ आॅगस्टपर्यंत करावी अन्यथा क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’चा नारा देत आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा देतानाच ९ आॅगस्ट रोजी भवानी मंडपात एक दिवसाचे धरणे धरण्याचा निर्णय आज सायंकाळी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आचारसंहिता लागण्यापूर्वी टोल रद्द झाला नाही तर निवडणुकीत विरोध करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कृती समितीच्या सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर अध्यक्ष निवासराव साळोखे यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. ८ आॅगस्टपर्यंत टोल रद्द करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील नव्या क्रांतीची लढाई सुरू होईल. ९ आॅगस्ट रोजी सागरमाळ येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून कृती समितीचे सर्व कार्यकर्ते मोर्चाने भवानी मंडपात येतील आणि दिवसभर धरणे धरतील. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी जनतेच्या वतीने गांधी मैदानावर ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय ध्वजारोहण समारंभाऐवजी जनतेने गांधी मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन साळोखे यांनी केले आहे.
मूल्यांकन समितीचे काम लांबत जाईल आणि आचारसंहितेची तारीख जवळ येईल तशी टोलविरोधी आंदोलकांत तीव्र नाराजी निर्माण होऊ लागली आहे. आजच्या बैठकीत अनेकांनी सरकारबद्दल आणि मंत्र्यांबद्दल संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत आता त्यांच्या दारात न जाण्याचा निर्णय घेतला गेला. बैठकीत पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची इच्छा काही कार्र्यकर्त्यांनी व्यक्त केली. परंतु उपोषण न करता ‘आयआरबी चले जाव’चाच लढा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, दिलीप देसाई यांनी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री जनतेच्या बाजूने राहणार नसतील तर त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घ्या अशी सूचना इंदूलकर यांनी केली. एकदा आमरण उपोषण सुरु केल्यावर कोणाही नेत्याचे ऐकून घेणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला. प्रसाद जाधव यांनी आम्ही काही कार्यकर्ते जलसमाधी घेण्यास तयार असल्याचे जाहीर केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, पंडितराव सडोलीकर यांनीही मते मांडली. (प्रतिनिधी)