ग्रामपंचायतीची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:37+5:302021-07-22T04:16:37+5:30
यड्राव : येथील ग्रामपंचायतीकडील ठरावाचा गैरवापर करून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास या योजनेअंतर्गत कामांचे परस्पर अंदाजपत्रक ...

ग्रामपंचायतीची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करा
यड्राव : येथील ग्रामपंचायतीकडील ठरावाचा गैरवापर करून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास या योजनेअंतर्गत कामांचे परस्पर अंदाजपत्रक तयार करून घेऊन त्यास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीसह परस्पर ई-टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. ग्रामपंचायतीची दिशाभूल करून मनमानीपणे ग्रामपंचायतीची कोणतीही वर्क ऑर्डर नसताना काम सुरू करणारा ठेकेदार अमित कांबळे (रा. हरोली) यांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर समाजकल्याण विभागाकडून आलेल्या परिपत्रकानुसार २९ एप्रिलच्या ग्रामपंचायत मासिक सभेत गावभाग, बेघर वसाहत, दलित वस्तीमध्ये सात लाख रुपयांच्या गटारी व रस्ते तयार करण्यासंदर्भात व स्थळ निश्चित करण्यासाठी ठराव करण्यात आला होता.
या ठरावाचा गैरवापर करत ठेकेदार अमित कांबळे यांनी संबंधित बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतीचे कोणतेही पत्र नसताना अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेतली आहे. याबाबत ग्रामपंचायतीस कोणताही माहिती दिली नाही. तसेच ठेकेदाराने ग्रामपंचायतीकडून वर्क ऑर्डर न घेता बेकायदेशीरपणे काम केल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले असल्याने ग्रामपंचायतीने या ठेकेदाराचे काम बंद करून त्याच्या सर्व कामाचे ई-टेंडर रद्द केले आहे.
तसेच या ठेकेदाराने ग्रामपंचायतीने स्थळ निश्चित केलेल्या ठिकाणी काम न करता इतरत्र काम करीत असल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे अमित कांबळे या ठेकेदाराचा ठेका परवाना रद्द करावा, अशी जिल्हा परिषदेकडे मागणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उपसरपंच प्राची हिंगे व ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे यांनी दिली.