अन्नसुरक्षा लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करा

By Admin | Updated: August 25, 2014 22:10 IST2014-08-25T21:42:30+5:302014-08-25T22:10:33+5:30

कॉँग्रेसची मागणी : इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

Revisit Food Security Beneficiaries | अन्नसुरक्षा लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करा

अन्नसुरक्षा लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करा

इचलकरंजी : अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी ठरविताना पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे. योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अन्नसुरक्षा यादीची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा यादी जाहीर करावी व पात्र लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा व्हावा, यासह स्वस्त धान्य दुकानातून धान्य व रॉकेलचा होणारा काळाबाजार तातडीने रोखावा, आदी मागण्या येथील शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाने केल्या.
यावेळी पुरवठा अधिकारी के.बी.देसाई यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडण्यात आले. मागण्या तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिला.
दरम्यान, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर येत्या आठ दिवसांत यादीचे फेरसर्व्हेक्षण करून सप्टेंबर महिन्यात सर्वच पात्र लाभार्थ्यांना धान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुरवठा अधिकारी देसाई यांनी दिली आहे.
महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले. प्रमुख मार्गांवरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला असता तेथे सभेत रुपांतर झाले.
यावेळी कामगार नेते शामराव कुलकर्णी, रंगराव लाखे, अशोकराव आरगे, आदींची भाषणे झाली. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी जिरंगे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजी शहर हे कामगार व कष्टकरी वर्गाचे शहर असल्याने येथील यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाले, गवंडी कामगार, बिगारी, हमाल असे अनेक कष्टकरी गरिबीच्या परिस्थितीत राहत असून, लहान-मोठ्या मिळून ३० ते ३२ झोपडपट्ट्या या शहरात आहेत. सध्या जाहीर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सन २०११ पर्यंत नोंद असलेल्या यादीतील ४५ टक्के लाभार्थी धरण्यात आले आहेत. योजनेमध्ये सदरचे लाभार्थी ठरविण्याचे काम रेशन दुकानदारांना सोपविण्यात आले होते. ही यादी तयार करत असताना रेशन दुकानदारांनी जाणूबुजून योग्य लाभार्थ्यांची निवड न करता जे कार्डधारक धान्य घेत नाहीत अशा लोकांची नावे घुसडून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे योग्य लाभार्थींना धान्य मिळत नाही. म्हणूनच या योजनेच्या यादीचे फेरसर्व्हेक्षण करावे.
शालेय पोषण आहार सर्व शाळांमध्ये योग्य पद्धतीने व नियमितपणे देण्यात यावा. आगामी गणपती, दसरा, दिवाळी, ईद या सणांकरीता साखर, तेल, डाळ, मैदा, आदी जीवनावश्यक वस्तू रेशन कार्डावर देण्यात याव्यात.
आंदोलनात प्रदेश कॉँग्रेस सचिव प्रकाश सातपुते, अहमद मुजावर, महिला कॉँग्रेस अध्यक्षा अंजली बावणे, शेखर शहा, तौफिक मुजावर, बापू घुले, दशरथ मोहिते, रामा नाईक, पांडुनाना बिरंजे, चंद्रकांत इंगवले, अब्राहम आवळे, संजय केंगार, आदींसह झोपडपट्टीधारक, नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Revisit Food Security Beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.