सुधारित : राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:38+5:302021-04-30T04:29:38+5:30

लोकसभेचे राजकारण : महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस दूर राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने लोकसभेचे राजकारण : महाविकास आघाडीपासून ...

Revised: Raju Shetty's move towards BJP again | सुधारित : राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने

सुधारित : राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने

लोकसभेचे राजकारण : महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस दूर

राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने

लोकसभेचे राजकारण : महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस दूर

(राजू शेट्टी यांचा फोटो वापरावा)

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी अलीकडील काही दिवसांत घेतलेल्या भूमिकेवरून दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांना आगामी निवडणुकीत लढायचे असेल तर महाविकास आघाडीतून त्यांना संधी मिळणेच शक्य दिसत नाही. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठीच्या यादीला राज्यपालांनी मंजुरी न दिल्याने लटकली आहे. त्यामुळे ते एकेक पाऊल महाविकास आघाडीपासून दूर जात असल्याचे दिसत आहे. आज महाराष्ट्रात ज्यांच्या मागे जनमत आहे, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, असे ते एकमेव शेतकरी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला कायमच महत्त्व राहिले आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत त्यांनी पारंपरिक भूमिका बदलून सत्तारूढ आघाडीस पाठिंबा दिला. गेली काही वर्षे ते ज्यांना दुधातील काळे बोके म्हणून हिणवत होते, दूध दरवाढीसाठी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष करत होते, त्यांनाच पाठिंबा देऊन गोकुळच्या कामकाजाबद्दल त्यांनी प्रमाणपत्र देऊन टाकले आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत परंतु ‘गोकुळ’ला पाठिंबा ही त्यांचा तत्कालिक निर्णय नसून तो लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या पाठबळावर त्यांनी ही निवडणूक लढविली. ज्यांना आयुष्यभर चाबकाचे फटकारे देण्याची भाषा केली त्या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसला? अशा भूमिकेतील विरोधाभास तयार झाल्याने त्याचा फटका बसून त्यांचा पराभव झाला. तिथे शिवसेनेकडून धैर्यशील माने निवडून आले. त्यानंतरच्या घडामोडीत दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सत्तेत एकत्र आली. त्यामुळे जेव्हा केव्हा लोकसभा निवडणुका होतील तेव्हा विद्यमान खासदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघात शेट्टी यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत विधान परिषदेच्या एका जागेचा ‘शब्द’ दिला होता. त्यानुसार राजू शेट्टी यांचे नाव महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविले; परंतु ते राजभवनात लटकले आहे. त्या अस्वस्थतेतून त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा स्वतंत्र उमेदवार उभा केला. त्यानंतर त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा..!’ असे ट्वीट करून आपण वेगळा विचार करत असल्याचे सुचित केले होते. चारच दिवसांपूर्वी एकरकमी एफआरपी देण्याची पद्धत बदलण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असताना त्यांनी तसे कराल तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, अशी टीका केली होती. या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष करण्याची त्यांची भूमिका आहे. या सगळ्या घडामोडी ते महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस बाजूला जात असल्याचे प्रत्यंतर आणून देणाऱ्या आहेत.

...भाजप ते भाजप वर्तुळ पूर्ण

‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीस पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात घरफाळाप्रकरणी जाहीर टीका केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांचे विरोधक असलेल्या महाडिक गटाला पूरक होईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. आगामी निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या चिन्हावरच परंतु भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून ते रिंगणात येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण संपविण्याच्या नादात त्यांची स्वत:ची खासदारकी गेली. दोन्ही काँग्रेसच्या सोबत जावून फायदा कमी व नुकसानच जास्त झाल्याने ते पुन्हा राज्याच्या राजकारणात भाजपसोबत जाण्याची चिन्हे आहेत तसे झाले तर त्यांचेही राजकीय भूमिका बदलण्याचे वर्तुळ पूर्ण होईल.

--

Web Title: Revised: Raju Shetty's move towards BJP again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.