‘आयआरबी’च्या रस्त्यांचे शुक्रवारी होणार फेरमूल्यांकन

By Admin | Updated: July 19, 2015 00:26 IST2015-07-19T00:26:24+5:302015-07-19T00:26:41+5:30

ओहोळ, तुपेकर कोल्हापुरात; रस्त्यांची पाहणी

The revised IRB route will be revised on Friday | ‘आयआरबी’च्या रस्त्यांचे शुक्रवारी होणार फेरमूल्यांकन

‘आयआरबी’च्या रस्त्यांचे शुक्रवारी होणार फेरमूल्यांकन

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून कोल्हापुरात आयआरबीने केलेल्या रस्त्यांचे अंतिम मुल्यांकन ठरविण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीची शुक्रवारी (दि.२४)ला मुंबईत बैठक
होणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पुणे विभागाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ, कार्यकारी अभियंता तुपेकर, नोबेल कंपनीचे प्रतिनिधी धर्माधिकारी यांनी या रस्त्यांची सुमारे चार तास पाहणी केली. नोबेल कन्सल्टिंग कंपनीने १३ जूनला सादर केलेल्या प्राथमिक अहवालातील त्रुटींची खातरजमा करणे तसेच अन्य काही त्रूटी असतील तर त्यांचा समावेश अंतिम अहवालात करणे हा या पाहणीचे उद्देश असल्याचे
सांगण्यात आले.
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आयआरबीच्या रस्त्यांचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी अचानक ओहोळ, तुपेकर व धर्माधिकारी दाखल झाले. त्यांनी दुपारी चार वाजता कसबा बावडा येथून या रस्त्यांची पाहणी सुरु केली.सायंकाळी सात वाजता रंकाळा-फुलेवाडी रस्त्याची पाहणी करुन ती संपविण्यात आली.यावेळी ओहोळ यांना,‘फूटपाथच्या कडेला असलेल्या पाईपलाईन’, रस्त्याच्या कामाचा दर्जा व त्यांचे मोजमाप’, रंकाळा चौपाटी-फुलेवाडी रस्त्यावरील पडलेली दगडी संरक्षक भिंत आदी त्रुटी दिसल्या. यावेळी आयआरबीने रस्त्यामध्ये वापरलेले काँक्रिट व त्यांचे २०१०-११ला असलेले बांधकाम साहित्याचे दर याची माहिती कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता तथा सदस्य, टोलविरोधी कृती समितीकडून असलेल्या ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट इंजिनिअरच्या सदस्यांनी ओहोळ यांना दिली. त्यावर ओहोळ यांनी ज्या त्रुटी असतील त्या तत्काळ दुरूस्त करण्याच्या सूचना नोबेलला दिल्या जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी फेरमूल्यांकन समितीचे सदस्य तथा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, अभियंता सुधीर हंजे, प्रसाद मुजुमदार, राज डोंगळे, बाजीराव भोसले उपस्थित होते.
विद्युतखांबाचा खर्च मूल्यांकनातून वगळणार
रस्त्याच्या कडेला जुने विद्युत खांब व दुय्यम दर्जाचे बसविण्यात आले आहेत. त्या विद्युतखांबांचा खर्च हा मूल्यांकनामधून वगळण्याच्या सूचना नोबेल कंपनीला करणार असल्याचे समजते.
मंत्र्यांना अहवाल देणार
फेरमूल्यांकन समितीच्या मुंबईत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत मूल्यांकन संदर्भात चर्चा होणार असून, अंतिम मूल्यांकन ठरणार आहे. हा मूल्यांकन अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना एमएसआरडीसी सादर करणार आहे.
या रस्त्याची झाली पाहणी
कसबा बावडा रोड
सर्किट हाऊस रस्ता ते खानविलकर पेट्रोल पंप
सायबर चौक ते कळंबा जलशुद्धीकरण केंद्र
संभाजीनगर बसस्थानक ते क्रशर चौक (तलवार चौक)
रंकाळा चौपाटी ते फुलेवाडी पेट्रोल पंप

Web Title: The revised IRB route will be revised on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.