(सुधारित) शिवसेनेच्या आंदोलनानंतर ‘सीपीआर’मध्ये भूलतज्ज्ञाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:16+5:302021-01-17T04:21:16+5:30
दरम्यान, सीपीआर’मध्ये भूलतज्ज्ञ मिळावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली. ‘सीपीआर’मध्ये ‘भूलतज्ज्ञाअभावी ...

(सुधारित) शिवसेनेच्या आंदोलनानंतर ‘सीपीआर’मध्ये भूलतज्ज्ञाची नियुक्ती
दरम्यान, सीपीआर’मध्ये भूलतज्ज्ञ मिळावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली.
‘सीपीआर’मध्ये ‘भूलतज्ज्ञाअभावी अनेक शस्त्रक्रिया रखडल्या’ याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर पाठपुरावा करीत वाचा फोडली होती. त्याचे पडसाद शनिवारी तीव्रपणे उमटले. भूलतज्ज्ञ प्रश्नावरून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे व त्यांच्या साथीदारांनी ‘सीपीआर’मध्ये निषेध नोंदविला. आंदोलकांनी हृदय शस्त्रक्रिया विभागात जाऊन पाहणी केली. तसेच त्यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांंना फोन करून सीपीआरमधील भोंगळ कारभाराची चर्चा केली. अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या दालनात आंदोलक व डॉक्टरांची बैठक झाली. बैठकीत, अधिष्ठाता डॉ. मोरे हे विसंगत माहिती देऊ लागल्याने शिवसैनिक संतप्त झाले. २४ तासांत भूलतज्ज्ञ भरणार नसाल तर सर्व कार्यालयांना कुलपे लावू, असा इशाराच देऊन शिवसैनिक चर्चेतून उठले.
डॉ. मोरे यांनी आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची आंदोलकांशी फोनवर चर्चा घडविली. हृदय शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. आरती घोरपडे यांच्या कामकाजाबद्दलही नाराजी व्यक्त केली. घोरपडे यांची विभागातून उचलबांगडी करू, असे आश्वासन डॉ. मोरे यांनी शिवसैनिकांना दिले. उद्यापासून डॉ. हेमलता देसाई यांची भूलतज्ज्ञ म्हणून नियुक्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर देवरे, डॉ. गिरीष कांबळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, राजेंद्र जाधव, दिलीप देसाई, रणजित आयरेकर, पप्पू नाईक, अभिषेक बुकशेट, दिलीप जाधव, प्रकाश पाटील, आदी सहभागी झाले होते.
कुलूप लावतो...
दोन दिवसांपूर्वी नियुक्त झालेल्या भूलतज्ज्ञाने बैठकीतच पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नसल्याचे सांगितल्याने शिवसैनिक खवळले. फसवणुकीचे आश्वासन दिल्याबद्दल सर्व कार्यालयांना कुलूप लावू असा इशारा शिवसैनिकांनी अधिष्ठातांना दिला. सीपीआरमधील भोंगळ कारभार पाहून दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या डोळ्यात पाणी येत असेल, असेही पवार म्हणाले. अखेर चर्चेनंतर डॉ. देसाई व आणखी एकाची नियुक्ती करण्याचे आदेश डॉ. मोरे यांनी दिले.