प्रलंबित प्रश्नांचा दराडे घेणार आढावा
By Admin | Updated: November 14, 2014 00:44 IST2014-11-14T00:43:33+5:302014-11-14T00:44:57+5:30
आज बैठक : सरकार लागले कामाला

प्रलंबित प्रश्नांचा दराडे घेणार आढावा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे हे उद्या, शुक्रवारी येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर दराडे यांचा हा पहिलाच दौरा असून त्यातून सरकार कामाला लागल्याचे दिसत आहे.
दराडे यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांना या जिल्ह्णाच्या प्रश्नांबाबत चांगली जाण आहे. प्रश्न सोडवून घेण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. त्याचाही फायदा नक्कीच होणार आहे. जिल्ह्णांत सध्या टोलचा प्रश्न ऐरणीवर आहेच, त्याशिवाय शहराची हद्दवाढ, महालक्ष्मीचा विकास, उद्योजकांचे प्रश्न, शाहू मिलच्या जागेवरील महाराजांचे स्मारक, क्रीडा संकुल, डेंग्यूचा धोका, पंचगंगा प्रदूषण, सीपीआरचे दुखणे अशा विविध प्रश्नांचा आढावा या बैठकीत अपेक्षित आहे. महसूल, क्रीडा,आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत त्यांच्याशी संबंधित योजनांचे सादरीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.