अमृत योजनेच्या कामांचा आढावा घ्या : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:38+5:302021-06-19T04:16:38+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेतील कामांचा आढावा घ्यावा, झालेल्या कामाच्या ठिकाणी रस्त्याचे काम केले आहे की ...

अमृत योजनेच्या कामांचा आढावा घ्या : मुश्रीफ
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेतील कामांचा आढावा घ्यावा, झालेल्या कामाच्या ठिकाणी रस्त्याचे काम केले आहे की नाही, याची पाहणी करावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले.
राज्य सरकारमार्फत शहरात अमृत योजनेतून निधी देण्यात आला असून, त्यातून शहरातील ड्रेनेजलाईन तसेच जलवाहिनी टाकण्याची कामे सुरू आहेत. परंतु या कामाची गती फारच संथ आहे. ठेकेदार वेळेवर कामे करत नाहीत, अशा तक्रारी आलेल्या आहेत. तेव्हा या कामाचा आढावा घ्या, जेथे कामे पूर्ण झाली आहेत, तेथे रस्त्याचे काम ठेकेदाराने केले आहे की नाही, याची तपासणी करा, केले नसल्यास तातडीने करुन घ्या, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यास खुद्द प्रशासक बलकवडे यांनी संबंधित ठेकेदारास ३१ मार्च २०२१ ही अंतिम तारीख दिली होती. मात्र तरीही योजनेची कामे रेंगाळली आहेत. ठेकेदाराने उपठेकेदार नेमले आहेत. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. परंतु त्याचा त्रास मात्र शहरवासीयांना होताना पाहायला मिळत आहे.