महसूल कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू
By Admin | Updated: August 3, 2014 01:45 IST2014-08-03T01:43:24+5:302014-08-03T01:45:53+5:30
कामकाज ठप्प : शासकीय कार्यालयात शुकशुकाट

महसूल कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू
कोल्हापूर : राज्य सरकारकडे महसूूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेला बेमुदत संप आज, शनिवारीही सुरू होता. संपात जिल्ह्यातील सुमारे साडेआठशे कर्मचारी सहभागी झाले असल्याने, महसूल विभागाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांविना ओस पडली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील तहसीलदार, प्रांत कार्यालय, पुरवठा विभाग, सेतू, संजय गांधी निराधार योजना यांच्यासह सर्वच शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांमध्ये शिपाई, कोतवाल, कारकून, अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक संवर्गातील नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. आज दुपारपर्यंत संपात सहभागी झालेले जिल्ह्यातील सर्व कर्मचारी महावीर उद्यान येथे थांबून होते. त्यामुळे कार्यालयातील काम ठप्प राहिले. कामानिमित्त आलेल्या लोकांची यामुळे चांगलीच गैरसोय झाली.
या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. ६) मुंबई येथे महसूल मंत्र्यांनी बैठक बोलाविली आहे. तरीही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि. ४) सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारणार आहेत.
आंदोलनात संघटनेचे नेते विलासराव कुरणे, सुनील देसाई, प्रीती ढाले, अविनाश सूर्यवंशी, प्रसाद वडणेकर, माणिक निगवेकर, बबन शिंदे, विनायक लुगडे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)