१९ गटांच्या लिलावात अकरा कोटींचा महसूल
By Admin | Updated: January 21, 2015 00:10 IST2015-01-21T00:01:39+5:302015-01-21T00:10:20+5:30
वाळूची ई-निविदा : सर्वाधिक बोली घालवाड वाळूगटास

१९ गटांच्या लिलावात अकरा कोटींचा महसूल
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध नदीपात्रांतील वाळू उपसा करण्याचा लिलाव आज ई-निविदा पद्धतीने पार पडला. त्यांतील ६५ पैकी १९ वाळूगटांच्या लिलावातून राज्य सरकारला १० कोटी ६९ लाख ९० हजार ६८६ रुपयांचा महसूल मिळाला. सर्वाधिक १ कोटी ९० लाखांची बोली शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील वाळूगटास मिळाली. विशेष म्हणजे गेल्यावर्षी झालेल्या बोलीतून ५१ गटांना १० कोटी ९७ लाख मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला महसूल मिळाला आहे.
जिल्ह्यातील ५४ गटांचा तसेच आज, मंगळवारच्या लिलावात बोली न लागलेल्या ४६ गटांच्या लिलावाकरिता गुरुवारी (दि. २२) जाहीर नोटीस देऊन फेब्रुवारी महिन्यात बोली घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध नदीपात्रांतील ६५ वाळू / रेती गटांच्या लिलावाची निविदा व बोली प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने पार पडली. यामध्ये शिरोळ तालुक्यातून ४५, हातकणंगले तालुक्यातील चार, तर गडहिंग्लज तालुक्यातील १६ वाळूगटांचा समावेश होता. आज, मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत बोलीची प्रक्रिया आॅनलाईन सुरू होती. या वेळेत ७१ लिलावधारकांनी भाग घेतला.
या लिलावातून ६५ पैकी १९ वाळूगटांना आॅनलाईन बोली प्राप्त झाली. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील १५, गडहिंग्लज तालुक्यातील २, तर हातकणंगले तालुक्यातील २ वाळूगटांचा समावेश आहे. बोलीला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण १० कोटी ६९ कोटी ९० हजार ६८६ रुपये इतका महसूल मिळाला.
याबाबत माहिती देताना जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांनी सांगितले की, कोणताही वादविवाद न होता अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही बोली प्रक्रिया पार पडली. गेल्यावर्षी ५१ गटांतून १० कोटी ९७ लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा केवळ १९ गटांतून १० कोटी ६९ लाखांचा महसूल मिळाला आहे. अद्याप १०० गटांची बोली लागलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठा प्रतिसाद मिळाला आहे.